ajit pawar and manda mhatre

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Comment About Maharashtra Bhavan) यांनी महाराष्ट्र भवन उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

  नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan In Navi Mumbai) उभारण्याचा गेली अनेक वर्षे रखडलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Comment About Maharashtra Bhavan) यांनी सदर महाराष्ट्र भवन उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. गुरुवारी आमदार मंदा म्हात्रे  (Manda Mhatre) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रखडलेल्या महाराष्ट्र भवन प्रश्नांविषयी भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी भवन उभारणीस संमती दिली. बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या शासन दरबारी पाठपुराव्याला यश आले असून लवकरच नवी मुंबई वाशी येथे सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनाची वास्तू उभी राहणार आहे.

  इतर जिल्ह्यांतून मुंबईत येणाऱ्या नागरिकांना, तरुणांना महाराष्ट भवनचा आधार मिळणार आहे. हे महाराष्ट्र भवन राज्य सरकार उभारणार असून सिडकोने भवन निर्मितीसाठी भूखंड रु.१ या नाममात्र दराने देण्याबाबत प्रामुख्याने या बैठकीत चर्चा करण्यात आली.  येत्या ८ दिवसांत नगरविकास मंत्री, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको एम.डी., नवी मुंबई पालिका आयुक्त तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.  यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले असून त्यांच्यासह ही फोनवर संपर्क साधून चर्चा करण्यात आली असून त्याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

  नवी मुंबईत महाराष्ट्र भवन नसणे ही संपूर्ण नवी मुंबईकरांसमवेत मलाही खंत आहे. रखडलेल्या या कामासाठी मी २०१४ सालापासून पाठपुरावा करीत आली आहे. गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी देखील तातडीने महाराष्ट्र भवनाचे महत्व लक्षात घेत भवन उभारणीस हिरवा कंदील दिला आहे. महाराष्ट्र भवन निर्मिती ही काळाची गरज असून कोव्हीड काळात याची उणीव प्रकर्षाने जाणवली. सदर महाराष्ट्र भवन उभारणीकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु अर्थसंकल्पात करण्यात आलेली निधीची रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने सदर भूखंड १ रु. नाममात्र दराने देण्यात येणार असल्याने नवी मुंबईत सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनाची वास्तू उभी राहणार आहे.

  - मंदा म्हात्रे, आमदार भाजपा, बेलापूर विधानसभा क्षेत्र, नवी मुंबई

  महाराष्ट्र भवन नसणे ही शोकांतिका
  नवी मुंबईत वाशी येथे सर्व राज्यांच्या भवन निर्मितीसाठी सिडकोकडून भूखंड उपलब्ध करून दिले गेले आहेत.  त्यामध्ये “महाराष्ट्र भवन” उभारणीसाठी देखील ८, ००० स्क्वेअर.मी. भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. इतर राज्यांची भवने वाशी येथे उभी असून आजतागायत महाराष्ट्र भवनाची वास्तू उभारण्याकरिता एक वीटही रचण्यात आलेली नाही, ही राज्याची शोकांतिका ठरत आहे. इतर राज्यांनी सिडकोकडून भूखंड घेऊन सुसज्ज भवने बांधली आहेत. या भवनांच्या त्या त्या राज्यातील नागरिकांना मुंबईत आल्यावर अनेकदा लाभ घेता येतो. अनेक नागरिक या ठिकाणी राहतात. तर अनेकदा त्या त्या राज्याचे सांस्कृतिक कार्यक्रम या भवनात आयोजित केले जातात. मात्र आपल्या स्वतःच्या भूमीवर स्वतःच्या राज्याचे भवन नसणे याबाबत सातत्याने नवी मुंबईतून खंत व्यक्त केली जात होती. वाशी रेल्वे स्थानकातून प्रवास करणारा प्रत्येक नागरिक इतर राज्यांची भवन पाहत जाताना महाराष्ट्र भवन कोठे आहे अशी विचारणा अनेकदा करताना दिसतो. ही बाब लक्षात घेत आ. मंदा म्हात्रे यांनी सातय्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले असून मंदा म्हात्रे यांच्या विकासकामांच्या यादीत महाराष्ट्र भवनाचा समावेश झाला आहे.