नवी मुंबईतील रुग्णालयाच्या भूखंडावरून नव्या शीतयुद्धाला सुरुवात, मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक आमनेसामने ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर सिडकोने नवी मुंबई पालिकेला बेलापूर सेक्टर १५ येथील भूखंड (Land For Superspeciality Hospital In Navi Mumbai) नवी मुंबईत रुग्णालय उभारण्यासाठी दिला आहे. त्यासाठी पालिकेला १०७ कोटी रुपये भरायचे आहेत. आमदार म्हात्रे (MLA Manda Mhatre) अनेक वर्ष या विषयाचा पाठपुरावा करत आहेत. मात्र आता यात आमदार गणेश नाईकांनी (Ganesh Naik) उडी घेतल्याने या विषयाला राजकीय फोडणी मिळाली आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) क्षेत्रात अद्ययावत सुपरस्पेशालिटी रुग्णालय (Super speciality Hospital) उभारण्याचा निर्णय आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी घेतला आहे. त्यासाठी आमदार म्हात्रे या अनेकवर्ष पाठपुरावा करत आहेत. हा महत्वाकांक्षी प्रकल्प सत्यात उतरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर सिडकोने नवी मुंबई पालिकेला बेलापूर सेक्टर १५ येथील भूखंड (Land For Multispeciality Hospital In Navi Mumbai) नवी मुंबईत रुग्णालय उभारण्यासाठी दिला आहे. त्यासाठी पालिकेला १०७ कोटी रुपये भरायचे आहेत. मात्र आता यात आमदार गणेश नाईकांनी (Ganesh Naik) उडी घेतल्याने या विषयाला राजकीय फोडणी मिळाली आहे.

  विधानसभा अधिवेशनात सिडकोने रुग्णालयासाठी मोफत भूखंड द्यावा अशी मागणी आमदार नाईकांनी केली. मात्र या मागणीतून आमदार नाईकांनी थेट मंदा म्हात्रे यांच्या उपक्रमात लक्ष घातल्याने म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे रुग्णालय राजकीय वादात अडकण्याची शक्यता असून; निवडणुका जवळ आलेल्या असताना पुन्हा एकदा भाजपात ताई विरुद्ध दादा असे शीतयुद्ध यावरून रंगण्याची शक्यता आहे.

  एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने सिडकोचे ५०० चौ. मी. पेक्षा जास्त आकाराच्या भूखंडावरचे आरक्षण पालिकेने काढावे व हे भूखंड सिडको विकू शकते असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिडकोने भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यात आ. मंदा म्हात्रे यांनी रुग्णालयासाठी मागणी केली आहे. त्यासाठी सिडकोने बेलापूर सेक्टर १५ येथे साडेआठ एकर भूखंड उपलब्ध करून दिला आहे. या भूखंडावर संग्रहालय व खेळाचे मैदान अशी दोन आरक्षणे पालिकेनी विकास आराखड्यात टाकलेली आहेत. सिडकोने हाच भूखंड पालिकेला विकत घेण्याविषयी सुचवले आहे.  आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई शहरातील नागरिकांना महागडे उपचार स्वस्तात मिळावेत यासाठी  पालिकेचे स्वतःचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र आता मंदा म्हात्रे यांच्या महत्वकांक्षी अशा उपक्रमात आ. गणेश नाईक यांनी उडी घेतली आहे. आ. म्हात्रे यांनी खंत व्यक्त करताना तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय घ्या मात्र दुसऱ्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

  आ. गणेश नाईकांनी पुरवणी मागण्यांच्या तासाला सिडकोने नवी मुंबईत रुग्णालय उभारताना भूखंड मोफत द्यावा, अशी मागणी यावेळी केली. याआधी अनेकदा पालिकेने विविध सामाजिक सोयीसुविधांसाठी सिडकोकडून भूखंड घेतले आहेत.त्यावेळी सिडकोला कोट्यवधी रुपये दिले आहेत. आ. गणेश नाईकांचे पालिकेवर वर्चस्व असतानाच हे निर्णय सभागृहात झाले आहेत.
  असे असताना नेमके मंदा म्हात्रे यांच्या मागणीनुसार रुग्णालयाची प्रक्रिया प्रगतीपथावर असताना; आ. नाईकांनी ही भूमिका आत्ताच का घ्यावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  आ. मंदा म्हात्रे या रुग्णालयासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापासून पाठपुरावा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सांगूनच आ. म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेऊन रुग्णालयासाठी पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे एकाच पक्षात असल्याने; या परिस्थितीला राजकीय श्रेय मिळवण्याच्या नफ्या तोट्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  नगर विकास खात्याने दिलेल्या निर्देशात पालिका ५०० चौ.मी. भूखंड विकसित करण्याइतकी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का ? असे प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. सिडकोने उपस्थित केलेल्या शंकेवर बोलताना नवी मुंबई महापालिका गरीब नाही असा उल्लेख आ. गणेश नाईक यांनी केला. तर दुसरीकडे सिडकोने रुग्णालयासाठी सामाजिक जाणीव ठेवत रुग्णालयासाठी भूखंड फुकट द्यावा अशीही मागणी केली. आ. मंदा म्हात्रे यांनी मात्र आ. नाईकांच्या भूमिकेवर नाराजी दर्शविली असून;ती पक्षश्रेष्ठींपर्यंत देखील पोहोचल्याची चर्चा आहे.

  आ. नाईक व आ. म्हात्रे यांच्या राजकीय वादात प्रशासक बांगर यांच्यावर राजकीय दबाव तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून लोकोपयोगी प्रकल्पाची प्रक्रिया खोळंबण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र या भाजपातील राजकीय द्वंद्वात मात्र महाविकास आघाडीला प्रचाराचा मुद्दा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  वंडर्स पार्क शिवाय एकही पर्यटन स्थळ पालिकेला विकसित करता आलेले नाही. त्यामुळे पालिकेने या भूखंडावर टाकलेल्या संग्रहालयाच्या अरक्षणानुसार खरोखर संग्रहालय अस्तित्वात येण्यास किती कालावधी जाईल खरोखर हे संग्रहालय अस्तित्वात येईल का? हे पाहावे लागणार आहे. पालिका दरवर्षी अर्थसंकल्पात पर्यटनाच्या दृष्टीने नवनव्या कल्पना समाविष्ट करत असते मात्र त्यातील किती कल्पना कागदावरून जमिनीवर उतरल्या हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे संग्रहालयाऐवजी जर सुपरस्पेशालिटी रुग्णालय होत असल्यास त्याचे स्वागत नागरिक करणार आहेत. नवी मुंबईत अनेक नामांकित रुग्णालये असली तरी कोविड काळात याच नामांकित रुग्णालयांनी केलेली बीलापोटीची लूट पाहता स्वस्तात उपचार देणारे अद्ययावत रुग्णालय नवी मुंबईकरांसाठी लाभदायक ठरणार आहे.