वाढत्या वीज बिलाविरोधात डोंबिवलीकराचा उद्रेक

डोंबिवली : महावितरण विभागाची गेल्या तीन महिन्याची बिले भरमसाठ आल्याने येथील बाजीप्रभू चौक कार्यालयावर संतप्त नागरिकांनी धडक दिली व संताप व्यक्त केला. सध्या नागरिकांना मेसेजमार्फत बिलाची रक्कम

 डोंबिवली : महावितरण विभागाची गेल्या तीन महिन्याची बिले भरमसाठ आल्याने येथील बाजीप्रभू चौक कार्यालयावर संतप्त नागरिकांनी धडक दिली व संताप व्यक्त केला.

सध्या नागरिकांना मेसेजमार्फत बिलाची रक्कम येत असून एकदम मोठे आकडे बघून डोंबिवलीकर चक्रावून गेले आहेत. बिले भरण्यापेक्षा ती कमी करून घेण्यासाठी मोठी रांग लागली आहे. मात्र कर्मचारी नीट उत्तरे देत नाहीत. अगोदर बिल भरा असेच उलट सांगत आहेत. वीज ग्राहकाच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र सोय केली असल्याचा दावा अधिकारी करत असले तरी ते नागरिकांचे योग्य समाधान करू शकत नाहीत. एका वीजग्राहकाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचारी करत असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे संकेत मिळाले. सोमवारी बाजीप्रभू कार्यालयावर मोठी गर्दी झाली व यातून गोंधळ उडाला असे काही नागरिक म्हणाले. पोलिसांना पाचारण केल्यावर त्यांनी जमावाला पांगवले.

याबाबत कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता त्यांनी मार्चपासुन ग्राहक घरात असल्याने वीज वापर वाढला, वर्क फ्रॉम होम, वातानुकूलित वापर यामुळे वीज बिल जास्त वाढले आणि मुख्य म्हणजे एप्रिल पासून वीज दरात १० टक्के वाढ झाल्याने व सरासरी बिल या काळातले काढल्याने बिल जास्त वाटत आहे. वीज ग्राहकांना नीट माहिती देण्यासाठी स्वतंत्र खिडकी उघडण्यात आली असू ग्राहकांनी समजुन घ्यावे असे आवाहन केले.