मुंब्र्यात फ्लॅटचा स्लॅब कोसळला , ६ जण किरकोळ जखमी ; पालिकेने केली इमारत खाली व रूम सील

मुंब्रा कोळीवाडा येथील विशाखा अपार्टमेंट ही तळ अधिक पाच माळ्याची इमारत आहे. सदर इमारत ही ३० वर्ष जुनी असून इमारतीला आणि पिलरला तडे गेल्याने आणि स्लॅब पडून सहाजण जखमी झाले.

    ठाणे : मुंब्रा आनंद कोळीवाडा परिसरातील ३० वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब पडून सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे अग्निशमन दल, टोरांटो कंपनीचे अधिकारी यांनी पाहणी केली.

    महापालिकेने पाच माळ्याची विशाखा अपार्टमेंट इमारत खाली करून रूम सील करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची खोली रमाकांत यांच्या मालकीची असून इमारतीचा विद्युत आणि पाणीपुरवठाही खंडित करण्यात आल्याची माहिती सागर साळुंखे यांनी दिली.

    मुंब्रा कोळीवाडा येथील विशाखा अपार्टमेंट ही तळ अधिक पाच माळ्याची इमारत आहे. सदर इमारत ही ३० वर्ष जुनी असून इमारतीला आणि पिलरला तडे गेल्याने आणि स्लॅब पडून सहाजण जखमी झाले. जखमीत नंदा काडलक (५५) यांना चार टाके पडले. दक्ष मोहिते (८), अर्चना कडलक (३१), साकेत कडलक (१३), शाळीग्राम काडलक(६७) यांचा किरकोळ जखमींमध्ये समावेश असल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली.

    या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, टोरांटो अधिकारी यांनी पाहणी करून गुरुवारी सकाळी इमारत खाली करण्यात आली. पालिका प्रशासनाने रूम सील केली तसेच इमारतीचा विद्युत आणि पाणीपुरवठाही खंडित केलेला आहे. विशाखा अपार्टमेंट मध्ये एकूण २१ कुटुंब राहत होते. त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांनी दिली.