९०७ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेत मंजुरी; कोणतीही करवाढ नाही

उल्हासनगर मनपाचा ९०७ कोटींचा व १५ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीने आज महासभेत सादर केला. सर्वसंमतीने अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. यापूर्वी मनपा प्रशासनाने ४३० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता त्यात सुमारे ४७६. ९५ कोटींचा फुगवटा करण्यात आला आहे.

  उल्हासनगर (Ulhasnagar).  उल्हासनगर मनपाचा ९०७ कोटींचा व १५ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीने आज महासभेत सादर केला. सर्वसंमतीने अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. यापूर्वी मनपा प्रशासनाने ४३० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता त्यात सुमारे ४७६. ९५ कोटींचा फुगवटा करण्यात आला आहे . प्रशासनाने अर्थसंकल्पात सुचवलेली करवाढ रद्द करण्यात आली आहे.कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे उल्हासनगर वासियांना दिलासा मिळाला आहे.

  स्थायी समिती सभापती विजयी पाटील हे प्रकृती कारणास्तव पालिकेत आले नसल्याने स्थायी समिती सदस्य शिवसेनेचे कलवंतसिंग(बिट्टू)सोहता, भाजपाचे जमनादास पुरसवानी यांनी महापौर लिलाबाई आशान,उपमहापौर भगवान भालेराव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर,मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण उपस्थित होते. या अर्थसंकल्पात उत्पन्न ९०७ कोटी ४० लाख तर खर्च ९०७ कोटी २५ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. परिवहन सेवेसाठी लागणाऱ्या बसेस,अग्निशमन दल,आरोग्य विभाग,अंडर ग्राऊंड ड्रेनेजसाठी नव्या गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. शहरात असणाऱ्या एकूण ४ प्रभाग समितीसाठी पूर्वी प्रत्येकी १० लाख होता.आता प्रत्येकी ३० लाख करण्यात आला आहे.

  प्रत्येक प्रभागात महिला भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँक्रीट रोडकरिता २० कोटी,शहरात ४ स्मशानभूमी असून त्यांच्या विकासासाठी २ कोटी व बेवारस मृतकांच्या अंतिम संस्कारा करिता १ कोटी ची तरतूद करण्यात आलेली आहे.

  हा अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे फुगवण्यात आला असून या संदर्भात स्थायी समिती सदस्य जमनु पुरुसवणी यांना विचारले असता ते म्हणाले की ५०० कोटी रुपयांची मालमत्ता थकबाकी शिल्लक आहे, गेल्या वर्षीच्या व यंदाच्या वर्षीचा २०० कोटी मालमत्ता कर नागरिकांनी कोरोनामुळे भरलेला नाही ही थकबाकी देखील वसूल करणे बाकी आहे. नव्या बांधकामांना मंजुरी, नवीन विकास आराखड्यानुसार कामाला मंजुरी यामुळे कोट्यवधी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा होणार आहे, त्याचप्रमाणे राज्यसरकरकडून मिळणारा २४० कोटीचा ग्रँड ही सर्व रक्कम एकत्र केल्यास अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट साध्य होईल.

  पत्रकार भवनासाठी १ कोटींची तरतूद
  भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी या अर्थसंकल्पात पत्रकार भवनसाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केल्यानंतर या निधीला देखील मंजुरी मिळाली आहे. दरवर्षी अशी तरतूद केली जाते मात्र प्रत्यक्षात पत्रकार भवनचे काम कधी सुरू होईल याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून पत्रकार करीत आहेत.