होळी आधीच ठाण्यात पारा चढला; ठाण्यात ४२ अंश तर जिल्हयात ४३ अंशावर तापमान

ठाणे शहराप्रमाणे ग्रामीण भागात शनिवारी यंदाच्या मौसमातील उच्चांकी असा ४३ अंशापर्यंत पारा गेला आहे. सकाळी दहा वाजल्यानंतर रस्त्यांवर शुकशुकाट पसरत असून या अघोषित संचारबंदीमुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तसेच नागरिकांनी उन्हाच्या अशा काहिलीपासून बचाव करण्यासाठी टोपी व छत्र्यांच्या दुकानात आणि घशाची कोरड भागवण्यासाठी उसाच्या गुऱ्हाळाबाहेर तसेच थंडपेयाच्या दुकानासमोर गर्दी दिसून येत आहे.

    ठाणे : ठाणे शहरात शनिवारची दुपार म्हणजे उन्हाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. दुपारी ३ च्या सुमारास ठाण्यात तापमानाचा पारा ४२ अंशवार गेला असल्याची नोंद महापलिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केली आहे. एकप्रकारे आतापर्यंतचा उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे प्रदूषण विभागाने सांगितले आहे. दरम्यान होळी पेटण्याआधीच पारा चढल्याने प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.

    उष्ण वारे, डोक्यावर आग ओकणारा तळपता सूर्य, चटके लागणारे ऊन आदींमुळे ठाणे जिल्ह्यात अक्षरशः चटके सहन करावे लगात आहे. ठाणे शहराप्रमाणे ग्रामीण भागात शनिवारी यंदाच्या मौसमातील उच्चांकी असा ४३ अंशापर्यंत पारा गेला आहे. सकाळी दहा वाजल्यानंतर रस्त्यांवर शुकशुकाट पसरत असून या अघोषित संचारबंदीमुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तसेच नागरिकांनी उन्हाच्या अशा काहिलीपासून बचाव करण्यासाठी टोपी व छत्र्यांच्या दुकानात आणि घशाची कोरड भागवण्यासाठी उसाच्या गुऱ्हाळाबाहेर तसेच थंडपेयाच्या दुकानासमोर गर्दी दिसून येत आहे.

    दरम्यान शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारी याठिकाणी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्दळीच्या भागातील रस्ते अगदी निर्मनुष्य झाले आहेत. यामध्ये शीतपेयांची मागणी प्रचंड वाढली असून शहापूरमधील रसवंती गृह, सरबत विक्रेते यांच्याकडे नागरिकांची तोबा गर्दी उसळली आहे. सध्या मार्च महिन्याच्या अखेरीला तापमानाने ४३ अंश सेल्सियस इतकी मजल मारली असून यंदा उन्हाळ्याच्या उर्वरित दोन महिन्यात सर्वसामान्यांच्या अंगाची चांगलीच लाही लाही होणार आहे. वाढत्या उष्ण हवामानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उष्माघात होण्याची भीती अधिक असते. चक्कर येणे, डोकं दुखणे, डोळे लाल पडणे, लघवीला जळजळ होणे आदी त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने दररोज भरपूर पाणी, लिंबू सरबत, नारळ पाणी व ताक पिणे गरजेचे आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

    यंदा दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार उन्हाळ्याच्या काळात ठाणे व कोकण विभागामध्ये तापमान सरासरीहून जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या भागांमध्ये सध्या निर्माण झालेली ही स्थिती याची सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये अशी स्थिती आणखी काही वेळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत हवामानतज्ञानी व्यक्त केले आहे. सध्या निर्माण झालेल्या चक्रीय वातविरोधी स्थितीमुळे गरम आणि शुष्क हवा जाणवत आहे, असेही तज्ञानी स्पष्ट केले.