navi mumbai parking

नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात वाहनांच्या पार्किंगच्या समस्येने (Parking Problem In Navi Mumbai) डोके वर काढले आहे. शहरात सर्वत्र पार्किंगचा प्रश्न उपस्थित होत असतानाच; पालिकेच्या व खासगी रुग्णालयांतदेखील नो पार्कींगमुळे (No Parking) रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात लोकसंख्या वाढत असतानाच वाहनांची संख्या देखील दुपटीने वाढत आहे. या परिस्थितीत शहरात वाहनांच्या पार्किंगच्या समस्येने (Parking Problem In Navi Mumbai) डोके वर काढले आहे. शहरात सर्वत्र पार्किंगचा प्रश्न उपस्थित होत असतानाच; पालिकेच्या व खासगी रुग्णालयांतदेखील नो पार्कींगमुळे (No Parking) रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालये त्यांच्या परिसरात आतमध्ये पार्किंग करू देत नसल्याने; नाईलाजास्तव वाहने बाहेरील फुटपाथवर उभी करावी लागत आहेत. दुसरीकडे वाहतूक पोलीस अशा वाहनांना दंड ठोठावत असल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती सध्या शहरात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. यात नागरिकांना शिस्तीचे धडे देणाऱ्या पालिकेकडून देखील हीच वागणूक शहरातील करदात्यांना मिळत आहे.

  नवी मुंबई महापालिकेने नुकतेच अभ्यागतांना मुख्यालयात वाहने नेण्यास मज्जाव केला आहे. वाहने बाहेर ठेऊनच अभ्यागतांना आत चालत प्रवेश करावा लागत असून मुख्यालयाच्या बाहेर वाहनांची रांग लागत आहे. पालिकेच्या रुग्णालयांत जाताना देखील वेगळे चित्र नसून ;  पालिका रुग्णालयांत किरकोळ आजारासाठी औषधोपचारांसाठी येणाऱ्या व रुग्णाच्या नातेवाईकांना देखील रुग्णालय आवारात वाहन उभे करून दिले जात नसल्याने; सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. नाईलाजास्तव जवळच्या पदपथावर वाहन उभे करावे लागत आहे. मात्र तिथे वाहतूक पोलिसांची नजर पडून अनेकदा रुग्णाचे नातेवाईक बाहेर आल्यावर वाहन वाहतूक पोलिसांनी नेल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे नाहक दंडात्मक कारवाईस सामान्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या नातेवाईकांची चिंता करायची की वाहनाची असा पेच समोर उभा ठाकला आहे.मुख्य म्हणजे खाजगी रुग्णालये यास जुमानत नसताना पालिकेने त्यावर खासगी रुग्णालयांना खडसावणे गरजेचे आहे. मात्र पालिकेचे स्वतःच्या रुग्णालय परिसराबाबत तेच धोरण असल्याने सामान्यांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

  पालिकेने जे रुग्ण किंवा नातेवाईक आपल्याकडे येतात त्यांना पार्किंग सुविधा पुरवणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांनी स्वतःच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या एका वाहनासाठी टोकन द्यावे. जेणेकरून वाहने रस्त्यावर न उभी करता ती रुग्णालयाच्या मोकळ्या परिसरात उभी करता येतील. वाहने बाहेर उभी करत असल्याने वाहतूक पोलिसांकडून देखील कारवाई होत असल्याने रुग्णाचे नातेवाईक द्विधा मनःस्थितीत असतात. निदान पालिकेने स्वतःच्या रुग्णालय परिसरात ही योजना सुरू करावी व खासगी रुग्णालयांना दट्ट्या द्यावा. पालिकेने सम विषम जागा रुग्णालयांबाहेर सुरू करून दिलासा द्यावा.

  - विनय मोरे, रस्ते सुरक्षाविषयक तज्ञ

  ओसी देताना पालिकेने काय तपासले ?
  खासगी रुग्णालयांना ओसी देताना पालिकेच्या अधिकऱ्यांनी कोणती तपासणी केली आहे असा प्रश्न पडतो ? एका बेडमागे एक वाहन अशी तजवीज या खासगी रुग्णालयांसाठी करणे गरजेचे आहे. रुग्ण दाखल झाल्यावर निदान त्याच्या नातेवाईकांना वाहन आणण्याची व तितकी वाहन क्षमता असलेले पार्किंग आवारात तयार करण्याची गरज आहे. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ओसी देताना याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णालयाच्या आवारात मोठ्या जागा असूनही वाहने बाहेर पार्क करावी लागत आहेत.

  पालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात गेलो असता तिथे वाहन बाहेर पार्क करावे लागत आहे. मी स्वतः आजारी होतो म्हणून वाहन घेऊन गेलो होतो. मात्र वाहन लावायला जागा बाहेर उपलब्ध नव्हती. फुटपाथवर वाहने पार्क करण्यात आली होती. तिथे वाहनांच्या जागेवर वाहतूक पोलिसांनी वाहने उचलल्याचे खडूने खुणा केलेल्या आढळल्या. मग रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी काय करायचे. स्वतःचे वाहन सोडून खासगीत वाहनाने प्रवास करावा का ? पालिकाच जर पार्किंग करू देत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे ? मग निदान पालिकेने वाहतूक पोलिसांना रुग्णालयाबाहेरील नागरिकांवर कारवाई करू नका असे तरी सांगावे.

  - सुरेश देशमुख, शिक्षक

  रुग्णाला व नातेवाईकांची लांब वाहने उभी कडून चालत यावे लागते
  अनेकदा वाहन घेऊन रुग्णालयात गेल्यावर कळते को वाहन पार्क करायला जागाच नाही. आतमध्ये मात्र मोकळी पार्किंग जागा पालिका व खासगी रुग्णालयांत पाहण्यास मिळते. मात्र नाईलाज म्हणून पदपथावर वाहन उभे करावे लागते. अन्यथा लांबवर जाऊन सुरक्षित जागा शोधून वाहन उभे करावे लागते. नाहीतर वाहतूक पोलिसांकडून कारवाईस सामोरे जावे लागण्याची सतत धास्ती किरकोळ आजारच्या रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना वाटत राहते.

  पालिकेने आधी पार्किंग जागा करून द्यावी
  पालिकेने स्वतःच्या रुग्णालय आवारात वाहनांची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पालिका रस्त्यावर धूळखात पडलेली वाहने उचलून डम्पिंगमध्ये टाकते. मात्र स्वतःच्या मुख्यालयात, रुग्णालयात किंवा विभाग कार्यालयात येणाऱ्यांना मात्र वाहन पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पदपथ वाहनांनी भरून जात असून परिसर बकाल दिसत आहे.