अस्ताव्यस्त स्थितीत एमआयडीसी निवासी विभागात वीज बिलांचे शेकडो गठ्ठे

  • शेकडो वीज बिलांचे गठ्ठे इतरस्त्र सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये टाकून आम्ही वीज बिले वितरित केली आहेत अशा प्रकारची वल्गना वीज वितरण कंपनी करीत आहे असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत

डोंबिवली : महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या वीज बिलांचे अनेक शेकडो एकत्र गठ्ठे डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील काही सोसायटीच्या वीज मीटर जवळ टाकून महावितरण तर्फे वीज बिले वाटणाऱ्या ठेकेदाराने अनोखा मार्ग अवलंबल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. यामुळे बिले नागरिकांना वेळेवर मिळणार नसून वीज बिलाची तारीख उलटल्याने ग्राहकांना नाहक दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. जर ठेकेदारची चूक असेल तर निश्चित कारवाई करण्यात येईल अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाचे संक्रमण होऊ नये आणि कोरोनामुक्त शहर व्हावे म्हणून लॉकडाऊन आणि त्यानंतर आता अनलॉक व्यवहार सुरू होत आहेत. आधीच नोकऱ्यांवर गदा आली असून बेकारीच्या ओझ्याखाली जनता त्रस्त झाली आहे. वीज वितरणाच्या वारेमाप वीज बिलामुळे वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. प्रथम बील भरा मग आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल या अडेलतट्टू भूमिकेमुळेही नागरिक समस्याग्रस्त आहेत. शेकडो वीज बिलांचे गठ्ठे इतरस्त्र सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये टाकून आम्ही वीज बिले वितरित केली आहेत अशा प्रकारची वल्गना वीज वितरण कंपनी करीत आहे असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

अनेक सोसायटी, इमारतींचे बिले एकाच ठिकाणी अस्तव्यस्त टाकल्याने समस्या निर्माण झाली आहे. सुदर्शन नगर मधील साईश्रुष्ठी सोसायटी मध्ये शनिवारी सकाळी अशा प्रकारे बिले टाकण्यात आली आहेत. बिलांची शेवटची तारीख ९ऑगस्त २०२० ही असल्याने शिवाय चार महिन्यांचा अवधी नंतर प्रथमच हार्ड कॉपी बिले देण्यात असल्याने तीही नागरीकांना आता वेळेवर मिळणार नाहीत. त्यामुळे दंडासहित रक्कम नाहक नागरिकांना भरावी लागणार आहेत. जरी ऑनलाईन बिले महावितरणने पाठविली असली तरी अनेकजणांना ती पाहता येत नाहीत त्यात बहुतेक वीज ग्राहकांची बिले चुकीची, जास्त आली आहेत.

याबाबत महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंताना समाजसेवक राजू नलावडे यांनी फोटो सहित माहिती दिली असता त्यांनी सांगीतले पत्र द्या मी ठेकेदारवर कारवाई करतो. पण आज सुट्टी असल्याने सोमवारी पत्र द्या. म्हणजे पत्र दिल्यावरच कारवाई करणार. परंतु सदर वीज बिले सोमवार पर्यंत तशीच पडून राहणार असल्याने संबंधित ग्राहकांना वीज बिले कधी मिळणार अशी विचारणा होत आहे.