लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच ठाणे परिवहनच्या उत्पन्नात वाढ, दिवसाला होतेय एवढी कमाई

 २० लाख ठाणेकरांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी जवळपास ५०० बसेसची गरज असतानाही अपुऱ्या बसेसच्या दिमतीवर अवघ्या २१७ च्या आसपास बसेस सोमवारी रस्त्यावर धावल्या आणि परिवहनच्या एका दिवसाचे उत्पन्न पहिल्यांदाच १४ लाख ७५ हजारावर गेले. या उत्पन्नात वागळे डेपोमधून धावलेल्या परिवहनच्या बसेसनी सोमवारी २ लाख ३८ हजार ८७० रुपयांचे उत्पन्न मिळवले.

ठाणे : डबघाईला आलेल्या परिवहनला लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. मात्र या कोरोनाच्या काळानंतर आता परिवहन हळूहळू प्रगती पथावर येत आहे. परिवहन समिती सदस्य आणि परिवहन सभापती विलास जोशी यांच्या परिवहनच्या आगारांना  देण्यात येणाऱ्या वारंवारच्या भेटीने परिवहन कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढले आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच सोमवारी परिवहनचे उत्पन्न १४ लाख ७५ हजार एवढे झाल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी सांगितले.

२० लाख ठाणेकरांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी जवळपास ५०० बसेसची गरज असतानाही अपुऱ्या बसेसच्या दिमतीवर अवघ्या २१७ च्या आसपास बसेस सोमवारी रस्त्यावर धावल्या आणि परिवहनच्या एका दिवसाचे उत्पन्न पहिल्यांदाच १४ लाख ७५ हजारावर गेले. या उत्पन्नात वागळे डेपोमधून धावलेल्या परिवहनच्या बसेसनी सोमवारी २ लाख ३८ हजार ८७० रुपयांचे उत्पन्न मिळवले.

कळवा डेपोमधून रस्त्यावर धावलेल्या बसेस मधून १ लाख ५१ हजार ९७४ रुपये,  मुलाबाग डेपोच्या माध्यमातून ९४ हजेरी ५४४ रुपये, आनंदनगर बसडेपो मधून ९ लाख ८७ हजार ९८१ एवढे उत्पन्न सोमवारी झाले तर पासच्या माध्यमातून ७८ रुपये आणि दंडात्मक कारवाईचे २ हजार १५ रुपयेच असे मिळून सोमवारी पालिकेच्या परिवहनला मिळालेला उत्पन्नाचा एकदा हा १४ लाख ७५ हजार ४६२ एवढा झाला आहे.

या उत्पन्नात तेजस्विनी बसेसचा वाटा अपेक्षितच आहे. परिवहनच्या ताफ्यात ५० तेजस्विनी बसेस आहेत. मात्र महिला वाहकांच्या अभावाने रस्त्यावर कमी बसेस धावल्या. अन्यथा आणखीन उत्पनात भर पडली असती अशी प्रतिक्रिया परिवहन सभापती विलास जोशी यांनी व्यक्त केली. 

ठाणे परिवहनने सुरु केले ६ नवे रूट

ठाणे परिवहन समिती आणि सभापती यांनी परिवहन व्यवस्थापकांशी चर्चा करून नव्या सहा रूटवर परिवहन सेवा सुरु केली. यात नालासोपारा येथे एकट्या ठाणे परिवहन सेवेची बस सुरु आहे. तसेच माजिवडा-ते कल्याण फाटा, रिंगरूट प्रमाणे ठाणे स्टेशन सॅटिस ते मुलुंड चेकनाका ते सॅटिस   या सेवांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी परिवहनच्या बसेसची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी आता परिवहन सेवा सुरु करणार किंवा बसेसच्या फेऱ्या वाढविणार असल्याची माहिती आहे.