घोडबंदर रोड आणि ठाणे महापालिका
घोडबंदर रोड आणि ठाणे महापालिका

घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे. वाढीव पाण्याचे श्रेय आपल्याला घेण्यासाठी शिवसेनेचीही शिष्टमंडळे महापालिकेत धडकली असली, तरी महापौर नरेश म्हस्के यांच्या खणखणीत इशाऱ्यानंतर घोडबंदर रोड परिसराला अद्यापि वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या पाणीटंचाईचे चटके कायम असून, श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडवरील पाणी अडकल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे (Thane). घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे. वाढीव पाण्याचे श्रेय आपल्याला घेण्यासाठी शिवसेनेचीही शिष्टमंडळे महापालिकेत धडकली असली, तरी महापौर नरेश म्हस्के यांच्या खणखणीत इशाऱ्यानंतर घोडबंदर रोड परिसराला अद्यापि वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या पाणीटंचाईचे चटके कायम असून, श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडवरील पाणी अडकल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. त्यानंतर या संदर्भात भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबर रोजी आयुक्तांच्या दालनात बैठकही झाली होती. त्यात घोडबंदरवासियांसाठी वाढीव १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याचे आयुक्तांनी निर्देश दिले होते. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. या संदर्भात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठक घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याचे निर्देश दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी शिवसेनेमुळेच पाणीप्रश्न सुटल्याचा दावा केला होता. आपण एकाच बैठकीत हा निर्णय धसास लावल्याचा दावा त्यांनी केला. वाढीव पाणीपुरवठ्याचे श्रेय शिवसेनेला घेण्याचा महापौरांचा प्रयत्न होता. त्यावर भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी शरसंधान करून दोन वर्ष पाण्यासाठी ठणाणा सुरू असताना शिवसेना झोपली होती का, असा सवाल केला होता.

या बैठकीला व महापौरांच्या खणखणीत इशाऱ्याला साधारण तीन आठवडे उलटल्यानंतरही, घोडबंदर रोडवरील पाणीटंचाई कायम आहे. शिवसेना विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापौरांची भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मिडियावर ब्रह्रांडमधील पाणीटंचाई लवकरच दूर होणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपाला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही उतरल्याचे स्पष्ट होत आहे.

तब्बल दोन वर्षांपासून घोडबंदर परिसरासह ब्रह्रांड भागाला पाणीटंचाईचा फटका बसत आहे. मात्र, तो अद्यापी दूर झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून भाजपा-शिवसेनेकडून वाढीव पाण्याचे दावे केले गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौरांनी आता पाणीप्रश्न सोडविल्याचाच दावा केला. मात्र, अजूनही घोडबंदरवासियांची फरफट टळलेली नाही. भाजपा-शिवसेनेच्या श्रेयवादाच्या लढाईत तर घोडबंदर रोडचे पाणी अडकले नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्याचबरोबर संतापही व्यक्त केला जात आहे.

घोडबंदरला पाणी मिळवून देणारच– मनोहर डुंबरे, भाजप नगरसेवक 
— येणाऱ्या नवीन वर्षात घोडबंदरवासियांना आम्ही पाणी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना फक्त स्टॅण्ड करण्यासाठी पुढे येत असून, पाण्यामध्ये देखील राजकारण केले जात आहे. आम्हाला श्रेय मिळू नये यासाठी महापौर नरेश म्हस्के यांचे प्रयत्न आहेत. जानेवारी पर्यन्त वाढीव पाणी दिले नाही तर उपोषणाचे हत्यार उपसणार आहे.