
२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला देखील महाविकास आघाडी एकत्र सामोरी जाणार आहे. त्यावेळेस देखील महाविकास आघाडीचे सरकार येऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray Will Be Chief Minister Again In 2024 ) असतील असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी केला.
नवी मुंबई :महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi Government) सरकार स्थापन झाले असून त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला देखील महाविकास आघाडी एकत्र सामोरी जाणार आहे. त्यावेळेस देखील महाविकास आघाडीचे सरकार येऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray Will Be Chief Minister Again In 2024 ) असतील असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी केला. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीचे निर्माते खा. शरद पवार (Sharad Pawar)यांनी खासगीत सांगितलेली बाब असल्याचा दावादेखील आव्हाड यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे ऐरोलीतील विबग्योर शाळेत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी सायंकाळी पार पडला त्यावेळेस ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांवर शरद पवारांचा दबाव असल्याच्या बातम्या पेरल्या जात असून शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आव्हाड यांनी महाविकास आघाडी सरकार योग्यरित्या आपला कारभार करीत असून २०२४ नंतरही हेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.आघाडी सरकार सुरळीत सुरू असलं तरी स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचे देखील आव्हाड यांनी सांगितले.
निवडणुका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी पालिका व निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल, अशी वॉर्ड रचना करून घेते असा आरोप यावेळी आव्हाड यांनी शिवसेनेवर केला. तसेच उदाहरणादाखल त्यांनी ठाण्याचा अनुभव सांगितला आम्ही विरोध केल्यानं आयोगाने वॉर्ड रचनेत बदल होऊन दिले नाहीत. मात्र जर असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर हे लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मौका सभी को मिलता है
आघाडी धर्म पाळून आम्ही विरोध पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. पण तुम्ही मात्र पडद्या मागून संबंध ठेवायचे. मग आम्ही कशाला शत्रूत्व घायचे? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे? याचे पर्याय खुले असल्याचे सांगत शिवसेनेला इशारा दिला आहे.
दोघांचे भांडण, भाजपला लाभ
ठाण्यात आघाडी करून निवडणूका लढवुया असा पर्याय आपण शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यावर विचार न झाल्यास वेगळे लढून आपलेच नुकसान होणार असून;दोघांच्या भांडणात थेट भाजपाचा फायदा होईल व ठाणे जिल्हा भाजपाकडे जाईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले.
नवी मुंबई जिल्हाध्यक्षांवर उघड नाराजी
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भर मेळाव्यात नाराजी व्यक्त केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटन पत्रिकेत मंत्री असूनही माझं नाव नाही, तुमचही नाही. याबाबत जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काय केले. आयुक्तांना याचा जाब का नाही विचारला ? याविरोधात तुम्ही आयुक्तांना काळे झेंडे दाखवायचे होते? तुम्हाला कार्यक्रमाची माहिती देखील असू नये याचे आश्चर्य वाटते. सर्व आम्हीच करायचे मग तुम्ही काय करणार? असा प्रश्न विचारत आव्हाडांनी अशोक गावडे यांना भर मेळाव्यात सुनावले.
नाईकांना सोयीस्कर प्रभाग रचना केल्याचा आरोप
नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवरदेखील जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. नवी मुंबई पालिकेचे अधिकारी पटनीगिरे यांनी गणेश नाईकांना सोयीस्कर असलेली प्रभाग रचनात्मक आयुक्त बांगर यांना दाखवूनच निवडणूक आयोगाकडे पाठवली असा आरोप यावेळी आव्हाडांनी केला.