लॉकडाऊनमध्ये तोडकाम पूर्ण झालेल्या कोपर पुलाचे पावसाळ्यानंतर लोकार्पण होण्याची शक्यता

डोंबिवली : पूर्व-पश्चिम डोंबिवली शहराला जोडणारा पूर्वीचा एकमेव कोपर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे वाहतुकीसाठी गेले वर्षभर पूल बंद करण्यात आला होता. यामुळे डोंबिवलीकरांना अतिशय त्रासदायक

 डोंबिवली : पूर्व-पश्चिम डोंबिवली शहराला जोडणारा पूर्वीचा एकमेव कोपर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे वाहतुकीसाठी गेले वर्षभर पूल बंद करण्यात आला होता. यामुळे डोंबिवलीकरांना अतिशय त्रासदायक समस्यांना सामोरे जावे लागत होते. जरी जोशी हायस्कुलजवळील नवीन उड्डाणपुलाचा वापर केला जात असला तरी तो खूपच अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या भेडसावत होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अचूक नियोजनामुळे लॉकडाऊनचा विनियोग करून कोपर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसात धोकादायक पुलाचे तोडकाम पूर्ण झाले असून आता पुलाचा स्लॅब आणि इतर कामे पूर्ण करून पावसाळ्यानंतर कोपर उड्डाण पुलाचे लोकार्पण पावसाळ्यानंतर होईल अशी चिन्हे दिसून येत आहेत. कोपर उड्डाणपूल पूर्ववत झाल्यास डोंबिवलीकरांच्या अनेक समस्या सुटणार असून वाहतुकीचा खोळंबा निकाली निघणार आहे. लॉकडाऊनमध्येही चांगेली कामे होऊ शकतात हे कोपर उड्डाण पुलामुळे सिद्ध होणार आहे.

हा पूल बांधण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे तीन वेळा निविदा काढल्या तरी प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या अधिकारात रेल्वेच्या पुष्पक रेल कन्स्टक्शन प्रा. ली या ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोपर पुलाचे तोडकाम सुरु करण्यात आले. यासाठी रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅक करिता वाहतूक व विद्युत पुरवठा खंडित करून टप्याटप्य्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पुलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले. लॉकडाऊनमुळे पंधरा दिवसांमध्ये हे काम पूर्ण करता आले जर लॉकडाऊन नसते तर हेच काम करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला असता अशी माहिती महापालिका शहर अभियंता सपना कोळी-दवनपल्ली यांनी दिली.
 
अभियंता कोळी-दवनपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरील कॉंक्रीट स्लॅब तोडून त्याच्या सळ्या काढण्यात आल्या आहेत. पुलाचे गर्डर आणि तीन स्टक्चर सेफ असल्याने त्यांचा गंज काढून त्याचे पेंटिंग करणे हे काम रेल्वे मार्फत होणार असून सदर काम लवकर होईल. पण त्याच्या शेजारी असणारा राजाजी पथवरील अंडरपाथ पूलही धोकादायक असल्याने तो पूर्ण पाडून नव्याने बांधायचा आहे. त्यामुळे काही महिने लागणार आहेत. मुख्य म्हणजे कोपर उड्डाणपुलाजवळ वळण असल्याने समोरील गाडी न दिसल्याने अपघात होत असतात त्यामुळे ते वळण काढून सरळ रस्ता करायचा आहे. जर रेल्वे प्रशासनाने पुलाच्या कामासाठी स्टीलप्लेट टाकण्यास रेल्वे ब्लॉक लवकर दिला तर पुलाचे काम लवकर होईल. राजाजी अंडरपाथ पूल लवकर करण्यास काहीच अडचण नाही. तेथे इतर पर्यायी रस्ते आहेत. त्यामुळे त्याची अडचण होणार नाही. रेल्वे प्रशासनाने चांगली संधी दिली तर दिलेल्या कालावधीपेक्षाही कोपर उड्डाण पूल लवकर पूर्ण होईल. कोपर उड्डाण पूल नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह शहर अभियंता सपना कोळी-दवनपल्ली, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, अतिरिक्त रेल्वे प्रबब्धक आशुतोष गुप्ता वरिष्ठ विभागीय अभियंता मळभागे आदी विशेष मेहनत घेत आहेत.