अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून पुढील वर्गात प्रवेश द्या- विद्यार्थी भारतीची मागणी

कल्याण : अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरसकट रद्द करून पुढील वर्गात प्रवेश देण्याची मागणी विद्यार्थी भारती या संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. अंतिम सत्राच्या

कल्याण : अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरसकट रद्द करून पुढील वर्गात प्रवेश देण्याची मागणी विद्यार्थी भारती या संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच ही बाब चिंताजनक आहे. बरीच अशी कुटुंबे आहेत जी कोरोनाच्या जाळ्यात अडकली गेली आहेत. काही विद्यार्थी गावाकडे तर काही मुंबईत अडकून पडले आहेत. काहींकडे पुस्तके नाहीत, काहींच्या घरात अन्नाचा कण नाही, पैशाची चणचण आहे, काहींच्या घरात कोरोनामुळे मृत्यू ओढवले असून काही सोसायट्यादेखील सील आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे परीक्षेला सामोरे जायचे याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे, असे विद्यार्थी भारती राज्य कार्यवाह प्रणय घरत यांनी म्हटले.

 द्रोणाचार्य बनून फक्त अर्जुनाचा विचार न करता बिकट परिस्थितीत अडकलेल्या अनेक एकलव्यांचा देखील विचार करण्यात यावा. डोक्यावर परीक्षांची टांगती तलवार ठेवणे खूपच भयानक आहे. परिस्थितीचे गांभीर्य समजून अंतिम क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात. असे विद्यार्थी भारती राज्य अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी  सांगितले.  तर जगणे महत्वाचे आहे परिक्षा नाही. विद्यार्थ्यांना काही नियोजनानुसार पास करण्यात यावे. यामध्ये  मागील सर्व सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे. अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना मागील ५ सेमिस्टरच्या मार्क्स नुसार सरासरी काढून सहाव्या सेमिस्टरचे मार्क्स द्यावे.  पदवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी सीईटी परिक्षा घेण्यात यावी व सीईटीच्या गुणावरून पुढील माध्यमांना प्रवेश देण्यात यावा. मात्र कोरोनाची संपूर्ण परिस्थिती स्थिर झाल्यावरच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे टाळा. बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यत इंटरनेट सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी म्हटले असल्याचे राज्य सचिव जितेश पाटील यांनी काढलेल्या पत्रकात नमूद आहे.