थर्टी फर्स्टच्या तोंडावर ठाणे पोलिसांची मोठी कारवाई ; दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या (Thane Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १ किलो ७० ग्रॅम ब्राऊनशुगर (Brown Sugar) आणि १ किलो ७०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत १ कोटी ३७ लाख ७९ हजार रूपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : थर्टी फर्स्टच्या (Thirty First ) तोंडावरती ठाणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई सुरू केली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या (Thane Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १ किलो ७० ग्रॅम ब्राऊनशुगर (Brown Sugar) आणि १ किलो ७०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत १ कोटी ३७ लाख ७९ हजार रूपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे ग्रामीणच्या पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ डिसेंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत होते. यावेळी सावद नाका वरून पिसा डाँमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रोडच्या कडेला गाडी पार्क करून त्यात काही जण संशयास्पदरित्या बसून असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलीस पथकाने या गाडीतील दोघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना जागीच ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील इनोव्हा कारची तपासणी केली असता त्याच्या डिक्कीत एका प्लास्टिक पिशवी व डब्बात तब्बल १ किलो ७० ग्रॅम ब्राऊनशुगर व १ किलो ७०० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हे ड्रग्ज मिळून आले.

पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त करीत दोघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव व त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आरोपींनी कोठून आणले व ते कोणास विकणार होते याचा तपास पोलीस करीत आहेत.