उल्‍हासनगर येथे बेकायदा मोबाइल नेटवर्क बूस्‍टर्सवर यंत्रणेद्वारे कारवाई

या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील अनेक बेकायदेशीर पॅनेल ॲण्‍टेना व बेकायदेशीर बूस्‍टर्स काढून टाकण्‍यात आले आणि सापडलेले ॲण्‍टेना व बूस्‍टर्स काढून टाकण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. 

  ठाणे : दूरसंचार विभागाच्या (DoT) वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने स्थानिक प्रशासन व मोबाइल ऑपरेटर्स यांच्या संयुक्त पथकाच्या साथीने वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनमधील इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख अमित गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्रातील उल्हासनगर या ठिकाणी छापे घातले. अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये स्थापित करण्यात आलेले बेकायदा मोबाइल सिग्नल रिपीटर्स (Illegal mobile signal repeaters) काढून टाकण्यासाठी हे छापे (Raid) घालण्यात आले. हे रिपीटर्स स्थापन करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली. कारण भारतातील कायद्यानुसार बेकायदा मोबाइल बूस्टर्सची विक्री व स्थापना दंडनीय अपराध आहे.

  या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील अनेक बेकायदेशीर पॅनेल ॲण्‍टेना व बेकायदेशीर बूस्‍टर्स काढून टाकण्‍यात आले आणि सापडलेले ॲण्‍टेना व बूस्‍टर्स काढून टाकण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या.

  अमित गौतम परीक्षणानंतर म्हणाले, “बेकायदा मोबाइल बूस्टर्समुळे भारतातील मोबाइल दूरसंचार जाळ्याला धोका निर्माण होतो. अशा उपकरणांची विक्री व स्थापना करून काही अनैतिक कामे करणारे लोक भारतातील मोबाइल दूरसंचार जाळ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत आहेत. ही मोहीम बेकायदा मोबाइल सिग्नल बूस्टर्सच्या विरोधात आहे. अशा बूस्टर्समुळे कॉल ड्रॉप होणे तसेच मोबाइल जाळ्याची कनेक्टिविटी कमी होणे आदी प्रकार घडतात. आम्ही एक जागरूकता मोहीम सुरू केली आहे आणि तिच्या माध्यमातून आम्ही लोकांना बेकायदा मोबाइल सिग्नल बूस्टर्सचा वापर थांबवण्याचे आवाहन करत आहोत. या मोहिमेदरम्यान लोकांनी स्वेच्छेने रीपीटर्स सरेंडर केले आहेत आणि असे केल्यामुळे आपल्या भागातील नेटवर्कची कनेक्टिविटी सुधारल्याचेही त्यांनी स्वत:च कळवले आहे.

  डॉटच्या वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएमओ) दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही नागरिकाला परवान्याशिवाय वायरलेस टेलीग्राफी उपकरण बाळगण्याची परवानगी नाही.  बेकायदा रिपीटरची स्थापना, तो बाळगणे तसेच त्याची विक्री करणे हा भारतीय वायरलेस टेलीग्राफी कायदा, १९३३ आणि भारतीय टेलीग्राफ कायदा, १८८५ या दोन्ही कायद्यांखाली दंडनीय गुन्हा आहे. ज्या आवारांमध्ये बेकायदा रिपीटर्स लावलेले आढळतील, त्या आवारांच्या मालकांकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो.  

  बेकायदा मोबाइल सिग्नल रिपीटर्स खूपच त्रासदायक ठरत आहेत आणि ग्राहकांना यांमुळे कॉल ड्रॉप्स किंवा डेटाचा मंदावलेला वेग यांसारखे त्रास सहन करावे लागत आहेत. हे बेकायदा रिपीटर्स व्यक्ती/आस्थापने यांच्याद्वारे घरे/कार्यालये/पीजी/गेस्ट हाउसेस आदी ठिकाणी मोबाइल सिग्नल उंचावण्यासाठी लावले जातात पण हे बेकायदा रिपीटर्स संपूर्ण मोबाइल नेटवर्कमध्ये ढवळाढवळ करतात, यामुळे सिग्नलच्या दर्जावर परिणाम होतो आणि संपूर्ण भागातील नेटवर्क अनुभव खालावतो. ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी मोबाइल ऑपरेटर्स स्पेक्ट्रमच्या संपादनात व नेटवर्क रोलआउटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मात्र, बेकायदा बूस्टर्स मोबाइल नेटवर्कमध्ये हस्तक्षेप करतात. म्हणूनच या बूस्टर्सची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली व कडक कारवाईची विनंतीही त्यांना करण्यात आली. 

  ग्राहकांना तसेच अन्य संबंधितांना शिक्षित करण्याच्या व त्यांना माहिती पुरवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाशी ही मोहीम सुसंगत आहे. बेकायदा रिपीटर्समुळे निर्माण होणाऱ्या दोषांबद्दल अखेरच्या ग्राहकाला माहिती देणे हे असोसिएशनचे उद्दिष्ट आहे. रिपीटर्सचा त्रास एकदा का नाहीसा झाला की, नेटवर्कच्या निकृष्ट दर्जाबद्दलच्या समस्यांचेही निराकरण होईल.

  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.