ठाण्याचा पारा घसरला, किमान तापमान १६ अंशांवर

ठाणे शहरात वाढत्या नागरिकरणाबरोबरच प्राकृतिक बदलदेखील घडत आहेत. यंदा तर अवकाळी पावसानंतर हिवाळी पावसानेही हजेरी लावल्याने वातावरणातील विचित्र बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसतोय. नाताळपासून पारा घसरत असून किमान तापमान १६ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे.

ठाणे : ठाण्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. मंगळवारी पारा १६ अंशावर घसरल्याने ठाणेकरांना हुडहुडी भरलीय. त्यामुळे,कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत असून या कालावधीत नागरिकांनी शरीराचे तापमान योग्य राखण्याची दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ठाणे शहरात वाढत्या नागरिकरणाबरोबरच प्राकृतिक बदलदेखील घडत आहेत. यंदा तर अवकाळी पावसानंतर हिवाळी पावसानेही हजेरी लावल्याने वातावरणातील विचित्र बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसतोय. नाताळपासून पारा घसरत असून किमान तापमान १६ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण तसेच,आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार,२५ डिसेंबर रोजी किमान तापमान २० अंश सेल्सियस, २६ डिसेंबरला २२ अंश, २७ डिसेंबरला २१ व २८ डिसेंबर रोजी कमाल ३१ आणि किमान १९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे,गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेल्या थंडीची अनुभूती येत आहे. ठाण्यातील तापमानाचा पारा हा चांगलाच खाली आला आहे. साधारणपणे २० अंश सेल्सियस असणारा पारा मंगळवारी तब्बल १६ अंशापर्यंत खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे.

गेले दोन दिवस सकाळपासूनच हवेत गारठा जाणवत होता. सकाळी फिरायला जाणारी मंडळी स्वेटर, कानटोप्यांचा आधार घेताना दिसत आहेत. साधारणत: दिवाळीच्या आधीपासून थंडी सुरू होते. यंदा मात्र थंडी काहीशी लांबली असून पहाटे साडेसहा वाजता किमान तापमान १६ अंशावर आल्याने ठाणेकर या सुखद गारव्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.