मिठाचा खडा टाकणाऱ्यांनो ठाण्यात आघाडी होणारच, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्यात एल्गार

काहीही झाले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे सुतोवाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Comment On Mahavikas Aghadi) यांनी केले.

    ठाणे : स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)होऊ नये यासाठी काही कार्यकर्ते मुद्दाम मिठाचा खडा टाकण्याचे काम करत असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि मी करत आहोत. त्यामुळे काहीही झाले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे सुतोवाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Comment On Mahavikas Aghadi) यांनी केले.

    ठाणे जिल्ह्यात विविध निवडणूका येऊ घातल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीला फक्त ९० दिवस शिल्लक राहिले असताना आपल्याला करिष्मा करून दाखवायचा असून येणाऱ्या निवडणुकीत जिल्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला विविध वक्त्यांनी अनेक विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आवाहन यावेळी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील काही नेते मुद्दामून मिठाचा खडा टाकण्याचे काम करत असल्याने आव्हाडांनी त्यांना एकप्रकारे गप्पा राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याचा रोष कोणावर होता हे माहीत नसून या विधानाने त्यांनी एकप्रकारे इशारा दिला असल्याची चर्चा कार्यक्रमात रंगली होती.

    आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचावे आणि भाजपने केलेल्या चूका लोकांना सांगाव्यात असे एकप्रकारे मार्गदर्शन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान ९९ टक्के ठाणे जिल्यात आघाडी होणारच असे सांगत आपला वैचारिक शत्रू भाजप असून त्यांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे. त्यामुळे आघाडी महत्वाची असून त्यासाठी मी दोन पाऊले मागे येण्यास तयार आहे पण आघाडीत ठाणे जिकून शरद पवार यांना वाढदिवसाची भेट द्या असे आवाहन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

    मी आज जिवंत आहे ते ‘उद्धव ठाकरेंमुळेच’
    कोरोना काळात जितेंद्र आव्हाड यांनी जीव ओतून सेवा केली, काम केले, दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेत आव्हाडांना कोरोना झाला होता. तेव्हा मी जगेन की नाही याची खात्री नव्हती, पण मी आता जो जिवंत आहे ते फक्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मुंबईच्या रुग्णालयात हलवले आणि त्यांच्यामुळे मी आता जिवंत असल्याचे यावेळी आव्हाड यांनी सांगत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फोनची आठवण आव्हाड यांनी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याइतके मेडिकल नॉलेज कोणाला नसून कुटूंबप्रमुख, कुटूंबवत्सल, सर्वांना काळजी घेणारा नेता म्हणून पवार यांच्यानंतर ठाकरेंकडे बघितले जात असल्याचे यावेळी आव्हाड यांनी बोलताना सांगितले.

    राऊत यांनी खुर्ची दिली हे संस्कार आणि संस्कृती
    खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना खुर्ची दिली त्यावरून सोशल मीडियात प्रचंड टीका सुरू आहे. भाजपची काही मंडळी टीका करत सुटली आहे. दरम्यान मोठ्या माणसांना खुर्ची दिली हे माणुसकीचे दर्शन असल्याचे यावेळी आव्हाड यांनी सांगितले. भाजप पक्षात वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठी देखील जागा नाही, अशी टीका यावेळी आव्हाड यांनी यावेळी केली. तसेच संजय राऊत यांनी पवारांना खुर्ची देऊन महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन त्यांनी दाखवून दिले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

    फॉलोअर्स वाढले म्हणून तुम्ही स्वतःला मोठे समजू नका
    फेसबुक, ट्विटर निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे फेसबुक आणि ट्विटर वर फॉलोअर्स वाढले म्हणून तुम्ही स्वतःला मोठे समजू नका असे बोलत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.