मनसेच्या १३ वर्षांच्या मराठी पाट्यांसाठीच्या आंदोलनाला यश, निर्णयाचे स्वागत मात्र अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा खळखट्याकचा मनसेच्या ठाणे- पालघर जिल्हाप्रमुखांचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मराठी पाट्यांसाठी (Marathi Boards) सर्वप्रथम आंदोलन छेडुन राज्यभर रान उठवले होते. त्यानंतर आता उशिरा जाग आलेल्या ठाकरे सरकारला ‘मराठी’ भाषेची (Marathi Language) आठवण झाली आहे.

    ठाणे : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये (Marathi Boards For Shops) असावेत, असा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मराठी पाट्यांसाठी सर्वप्रथम आंदोलन छेडुन राज्यभर रान उठवले होते. त्यानंतर आता उशिरा जाग आलेल्या ठाकरे सरकारला ‘मराठी’ भाषेची (Marathi Language) आठवण झाली आहे. याबाबत बोलताना मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून घेतलेला निर्णय फक्त कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी करा नाहीतरी ठाण्यात पुन्हा मनसे ‘खळखट्याक’ करेल असा इशारा यावेळी जाधव यांनी दिला. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.

    राज्य सरकारने दुकाने व आस्थापनांवरील फलक मराठी भाषेत लावण्यासह अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान मराठी भाषेसाठी आग्रह धरत आंदोलने करणाऱ्या मनसेनेमुळेच महाराष्ट्र राज्यात सर्व दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठीत होणार आहेत.

    मराठी पाट्याचे प्रथम आंदोलनाला ठाण्यात सुरुवात झाली होती, आता राज्य सरकारने घेतलेला निर्णय येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन घेतला आहे असा आरोप जाधव यांनी केला. निर्णय जरी योग्य झाला असेल तरी त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.