
खो - खो स्पर्धेत किशोर गटात १२ जणांच्या संघात ठाणे(Thane) जिल्ह्यातील एकमेव खेळाडू म्हणून निवड झालेल्या नवी मुंबईच्या(Navi Mumbai) आशिष गौतम(Ashish Gautam) याने राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून गणला जाणार भरत पुरस्कार(Bharat Award) पटकावला.
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : उत्तराखंडमधील(Uttarakhand) उना येथे झालेल्या राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो(Kho – Kho) स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी बाजी मारली. या खो – खो स्पर्धेत किशोर गटात १२ जणांच्या संघात ठाणे(Thane) जिल्ह्यातील एकमेव खेळाडू म्हणून निवड झालेल्या नवी मुंबईच्या(Navi Mumbai) आशिष गौतम(Ashish Gautam) याने राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून गणला जाणार भरत पुरस्कार(Bharat Award) पटकावला.
संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यानुसार आशिष गौतम याने संपूर्ण स्पर्धेसह अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यास भरत पुरस्कार बहाल करण्यात आला. ठाणे येथे झालेल्या खो – खो राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये १४ वर्ष वयोगटात आशिषची निवड करण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून खेळाडू या निवड चाचणीसाठी आले होते. त्यातून ठाणे जिल्ह्यातून अवघ्या आशिषचीच निवड होऊ शकली होती. आशिष हा नवी मुंबईतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज या पालिकेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनाने व प्रशिक्षक प्रताप शेलार व स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे न कंटाळता आशिषने सराव करून हे यश मिळवले.
झोपडपट्टीत राहणाऱ्या आशिषने भारतातील सर्वोच्च असा भरत पुरस्कार मिळवून महाराष्ट्र राज्यासह नवी मुंबईची मान अभिमानाने उंचावली आहे. आशिष हा झोपडपट्टी भागातील मुलगा आहे. घरची हलाखीची परिस्थिती असतानाही त्याने स्वतःची आवड जपली. प्रचंड मेहनत करून त्याने हे यश मिळवले आहे. ‘मी भरत पुरस्कार मिळवून आणेन’ या त्याच्या वाक्यात आम्हाला आत्मविश्वास जाणवत होता. ते वाक्य त्याने या बालवयात खरे करून दाखवले. या असामान्य कर्तृत्वाने इतर मुलेदेखील खोखो या मातीतल्या खेळाकडे वळतील. आशिषला व त्याचे प्रशिक्षक प्रताप शेलार व स्वप्नील पाटील यांना शुभेच्छा.
- सुधाकर सोनवणे, माजी महापौर, नवी मुंबई
आशिष हा रबाळे येथील झोपडपट्टी भागात राहतो. शिक्षण घेण्याइतके पैसे नसल्याने त्याला खासगी शाळेतील शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. आशिषला खेळण्याची आवड असल्याने तो शाळेत खो खो खेळण्यास येत होता. त्याच्या घरची हालाखीची परिस्थिती पाहता माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी आशिषला पालिका शाळेत प्रवेश दिला. साईबाबानगर झोपडीत राहणारा आशिष खूप मेहनती आणि जिद्दी आहे हे माजी महापौर सोनावणेंना कळले होते. त्यांनीही त्याच्यातील कलागुण जोपासत त्याच्यासाठी अगदी पहाडा प्रमाणे उभे राहिले. प्रशिक्षक प्रताप शेलार व स्वप्नील पाटील यांनी देखीलआशिषचे कौशल्य व जिद्द हेरली. इतर मुलांप्रमाणेच त्याच्याकडून सराव करून घेतला. आशिषने देखील खोखोतील कौशल्ये आत्मसात करत १४ वर्षांच्या मुलांच्या गटात खो खो क्षेत्रातील भारतात सर्वश्रेष्ठ असलेला भरत पुरस्कार पटकावून संघाचे व पालिकेच्या शाळेचे नाव इतिहासात कोरले आहे.
आईच्या निधनांनातर दुसऱ्या दिवशी मैदानात
आशिष देखील तन मन धनाने सराव करत होता. आशिषच्या आईचे निधन झाल्यानंतरच्या दुसर्या दिवशीच तो सरावासाठी मैदानात उतरला होता. यातून त्याची खेळाप्रती असलेली आवड,आपुलकी व प्रेम दिसून आले होते.
मी भरत पुरस्कार मिळवणारच
ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पार पडली होती. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या संघात निवड होताच आशिषने माजी महापौर सुधाकर सोनवणे, प्रशिक्षक प्रताप शेलार व स्वप्नील पाटील यांना भरत पुरस्कार घेऊनच येणार असा आत्मविश्वास बोलून दखवला होता. त्या दर्जाचा अष्टपैलू खेळ करत आशिषने अखेर भारतातील सर्वोत्कृष्ट भरत पुरस्काराला गवसणी घातली. त्याची जिद्द इतर खेळाडूंनाही भविष्यात प्रेरणादायक ठरणार आहे. आशिषच्या या यशात विहंग स्पोर्ट्स क्लबचे रवी परमाणे, कानिफ बांगर व फिजिओथेरपिस्ट निवेदिता पाष्टे यांचाही मोलाचा वाटा आहे.
आशिषमुळे खो खो खेळाला अच्छे दिन
भरत पुरस्कार मिळवून ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतानाच नवी मुंबई शहराचे देखील नाव आशिष याने उंचावली आहे. आशिष याच्या वयाची पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली असताना, मातीतल्या खेळाकडे तोंड फिरवणाऱ्या या पिढीसाठी आशिषचे हे कर्तृत्व प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.