jwell of navi mumbai

नवी मुंबई पालिकेने (NMMC) ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या या पावणे तीन किलोमीटर क्षेत्राचा करावे गावाच्या (karawe Green Area) बाजूने विस्तार केला आहे. मात्र या विस्तारलेल्या क्षेत्राच्या सौंदर्याला सध्या दुरावस्थेचे ग्रहण लागले आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने (NMMC) शहरातील सर्वाधिक सुंदर असा ज्वेल ऑफ नवी मुंबईचा (Jwell Of Navi Mumbai) हिरवळीचा पट्टा तयार केला आहे. तलावाच्या भोवती उभारलेल्या या पट्ट्यामुळे नागरिकांना हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण मिळाले आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या या पावणे तीन किलोमीटर क्षेत्राचा पालिकेने करावे गावाच्या (karawe Green Area) बाजूने विस्तार केला आहे. मात्र या विस्तारलेल्या क्षेत्राच्या सौंदर्याला सध्या दुरावस्थेचे ग्रहण लागले आहे. निव्वळ पालिकेच्या दुर्लक्षामुळे पालिकेचे करोडो रुपये वाया गेले  आहेत. सध्या २०२२ सालाच्या स्वच्छता सर्वेक्षणाची पालिकेने तयारी सुरू केलेली असताना पालिकेकडून या हिरवळीच्या पट्ट्याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे ? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. आयुक्तांनी स्वतः भेट द्यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

  हे सुद्धा वाचा

  नवी मुंबई पालिकेने उभारलेल्या पहिल्या पाच प्रकल्पांमध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबईची नोंद होते. नवी मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडून देखील या प्रकल्पामुळे नवी मुंबई पालिकेच कौतुक होत असल्याने शहराला वैभव प्राप्त करून अशात  या उभारलेल्या प्रकल्पाचे सौंदर्य कायम जपण्याची गरज असताना याकडे काहीसे दुर्लक्ष होऊ लागले आहे. पालिकेने या प्रकल्पाचा विस्तार करत करावे गावलागतचा मोठा पट्टा विकसित केला होता. जॉगिंग ट्रॅकसह, स्टीलचे रेलिंग बांधण्यात आले होते. तर नागरिकांना व्यायाम करण्यासाठी असलेल्या जागेभोवती असलेल्या मैदानात सुंदर हिरवळ फुलवली होती. त्यात शिल्प व  बसण्यासाठी बाकडे बसवून सुंदर पट्टा तयार करण्यात आला होता. लहान मुलांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून हा विस्तारित भाग अल्पावधीत प्रसिद्ध झाला होता. मात्र या हिरवळीला उतरती कळा लागली आहे. मात्र दुसरी लाट उलटल्यावर उद्याने सुरू उघडली गेली. पालिकेकडून या उद्यानांची डागडुजी देखील करण्यात आली. मात्र या विस्तारित पट्ट्याकडे कित्येक महिने होऊन देखील पालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हे दुर्लक्ष पालिकेला भोवले असून; करोडो रुपयांवर पाणी फेरले गेल्याचे चित्र सध्या या विस्तारित पट्ट्याकडे पाहिल्यावर दिसून येते.

  लॉकडाऊनमध्ये पालिकेने उद्याने बंद केली होती. त्यावेळी अनेक उद्यानांची अशीच दुरावस्था होती. मात्र अनेक महिने  होऊन देखील पालिकेने लक्ष न दिल्याने या विस्तारित पट्ट्याला जंगलाचे स्वरूप आले आहे.

  संपुर्ण पट्ट्याला जंगली रोपांनी वेढले आहे. हिरवळ न जपल्याने गवत सुकून गेले आहे. त्या हिरवळीची जागा रानटी झुडपांनी घेतली आहे. वाढलेल्या गवतामुळे हिरवळीचा पट्टा नष्ट झाला आहे. व्हायाम करण्यासाठी असलेल्या जागेवर देखील शोभेच्या झडांची जागा रानटी रोपांनी घेतली आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेटची थोटके पडलेली दिसून येत आहेत. कचऱ्याचे डबेदेखील भरून वाहत असून, ठिकठिकाणी कचरा पडलेला आढळून येत आहे. मुख्य म्हणजे जॉगिंग ट्रॅक भोवती रानटी झाडे झुडपे वाढल्याने; या पट्ट्यावरून चालणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या रानटी झुडपांमुळे साप किंवा इतर सरपटणाऱ्या कीटकांचा वावर या ठिकाणी वाढण्याची शक्यता असून; त्यामुळे सायंकाळच्या वेळेस नागरिकांना त्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

  अश्लील चाळे वाढले
  या भागातील रानटी झाडेझुडपे वाढल्याने अश्लील चाळ्यांना उत आला आहे. या झुडपांचा आधार घेत अनेक जोडपी येथे बसू लागली असून;नागरिकांना माना खाली घालुन जावे लागत आहे. या वाढलेल्या झाडाझुडपांचा फायदा घेत गर्दुल्ले देखील येऊ लागले असून त्यातून गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.

  आमदारांच्या फंडातून उभारलेल्या ओपन जिम नादुरुस्त
  आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वतःच्या निधीतून या विस्तारित पट्ट्याच्या बाजूला असलेल्या हिरवळीवर ओपन जिम उभारली होती. मात्र पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे साहित्य नादुरुस्त व धोकादायक बनले आहे. या साहित्याचे नटबोल्ट सैल झाल्याने त्यावरून अपघात होण्याची शक्यता आहे. ओपन जिमवर सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक व्यायाम करत असतात. त्यांना  याबाबत माहिती नसल्याने त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे.  पालिकेच्या अधिकाऱ्यांना उभारलेल्या वस्तू वा वास्तू जपता येत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.