miyawaki project

नवी मुंबई(navi mumbai) शहरात विकासासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली जात असतानाच आयुक्त बांगर हे स्वच्छतेसोबत पर्यावरणात नवनवे बदल घडवून आणण्यासाठी आग्रही आहेत. त्यातूनच मियावाकी प्रोजेक्ट(miyawaki project in navi mumbai) आकारास आला आहे. मूळ जापनीज पद्धतीची(japanese style miyawaki forest) ही कल्पना असून जगभरात या कल्पनेला विविध देशांनी उचलून धरले आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका(navi mumbai corporation) आयुक्त अभिजित बांगर हे शहरातील वातावरण सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नवी मुंबई शहरासाठी यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्यासोबत पर्यावरणाला देखील प्राधान्य देण्यात आले आहे. नवी मुंबई शहराचा राहण्याजोग्या शहरांत देशात सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे.

  आधुनिक शहर म्हणवताना शहरातील प्रदूषणाने देखील धोकादायक पातळी ओलांडल्याचेपर्यावरण अहवालावरून अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे आयुक्त बांगर यांनी पर्यावरण सुधारण्याकडे प्राधान्य दिले असून त्यानुसार शहरात १० मियावाकी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातील नवी मुंबईतील पहिला ४० हजार वृक्ष लागवड केलेला पहिला मियावाकी प्रकल्प प्रत्यक्षात साकारला गेला आहे. उर्वरित ९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

  आपले दुर्दैव आहे की, आपल्या शहरांमध्ये विदेशी प्रजातांची झाडे कायम लावली जातात. रेन ट्री, गुलमोहर यासह अनेक झाडे ही विदेशी आहेत. मात्र अशा झाडांवर पक्षी, किटक, फुलपाखरे अधिवास करत नाहीत. शहरातून अनेक पक्षी जसे की चिमण्या लुप्त होत आहेत. याचे कारण मोबाईल लहरींसह विदेशी वृक्ष हे देखील आहेत. मियावाकी प्रोजेक्ट करताना देशी वृक्ष व जमिनीचा पोत सुधारण्याकडे आम्ही लक्ष देतो. सध्या नवी मुंबईतील रोपे ही काही फूट वाढली आहेत. येत्या काळात ती १५ ते २० फूट वाढतील. सध्या संस्थेचे कामगार देखभाल करत आहेत. त्यानंतर मात्र नैसर्गिकरित्या हे वृक्ष वाढून बहरतील. पक्ष्यांचा अधिवास वाढेल.

  - प्रदीप त्रिपाठी, ग्रीन यात्रा संस्था

  शहरात विकासासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली जात असतानाच आयुक्त बांगर हे स्वच्छतेसोबत पर्यावरणात नवनवे बदल घडवून आणण्यासाठी आग्रही आहेत. त्यातूनच मियावाकी प्रोजेक्ट आकारास आला आहे. मूळ जापनीज पद्धतीची ही कल्पना असून जगभरात या कल्पनेला विविध देशांनी उचलून धरले आहे. सध्या देशभरात विविध ठिकाणी मियावाकी प्रोजेक्त उभारलेल्या ग्रीन यात्रा या खासगी संस्थेकडून हे प्रोजेक्ट उभारले जात आहेत.

  नवी मुंबईत सोनी म्युजिक कंपनीच्या सीएसआर फंडातून कोपरखैरणेतील निसर्ग उद्यान येथे तब्बल १० एकरांवर हा प्रोजेक्ट उभारला गेला आहे. डिसेंबरमध्ये या प्रोजेक्टचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. पुढील दोन वर्षे झाडांची निगराणी राखावी लागणार असून त्यानंतर या उद्यानाची काळजी घ्यावी लागणार नाही,असे ग्रीन यात्रा संस्थेचे प्रदीप त्रिपाठी यानी सांगितले. मुख्य म्हणजे ही सर्व झाडे देशी जातींची असल्याने तब्बल पुढील शेकडो वर्षे ही झाडे जगतात. तसेच यामुळे जैवविविधता देखील वाढण्यास मदत होणार आहे.

  कसे साकारले मियावाकी उद्यान?

  • कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात असलेला १० एकरचा परिसर निश्चित करण्यात आला.
  • ठिकाण निश्चित केल्यावर मातीची रासायनिक, जैविक व भौतिक अशी शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी करण्यात आली.
  • माती योग्य असल्याचे अहवाल आल्यावरच खड्डे खणण्यात आले. मात्र खड्डे खणताना खोलवर गेल्यावर काँक्रीट, सिमेंट, डेब्रिज, प्लॅस्टिक हाती लागले. ते काधल्यावर त्या ठिकाणी पुन्हा माती टाकण्यात आली.
  • मातीचा पोत सुधारण्यासाठी व रोपांची वाढ होण्यासाठी नैसर्गिक खते वापरण्यात आली. गायीच्या शेणापासून तयार केलेलं खत वापरताना देखील जर्सी गायींऐवजी देशी गायींच्या शेणखताला प्राधान्य दिले गेले.  एकूण ४० हजार रोपे लावण्यात आली. त्यांस काठ्यांचा आधार देण्यात आला.
  • मियावाकी प्रकल्पाची खासियत म्हणजे अगदी जवळजवळ ही रोपे लावल्याने त्याचे पुढे घनदाट जंगल तयार होते. त्यानुसार ही रोपे जवळजवळ लावण्यात आली. सर्व झाडे ही देशी प्रजातींची लावण्यात आली आहेत.कदंब, नीमअर्जुन, बहावा, रक्तचंदन, कांचन अशी पक्ष्यांना आकृष्ट करणारी विविध अशी ६० जातींची झाडे आहेत.
  •  प्रकल्पातील काही झाडे अशी आहेत की त्यामुळे जवळपास ७२ ते ८० प्रकारचे पक्षी या झाडांकडे आकृष्ट होत त्यावर वास्तव्य करतात. त्यामुळे नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात येत्या काळात पक्षी, फुलपाखरे बागडताना दिसू शकतील. त्यासाठी पक्षी प्रेमींना कर्नाळा, खारघरसोबत कोपरखैरणेतील मियावाकी उद्यान हे आणखी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
  • एसटीपी प्लॅन्टमधून पुन्हा प्रक्रिया केलेलं पाणी या वृक्षांसाठी वापरण्यात येत आहे.दोन वर्षांनंतर नैसर्गिकरित्या हे वृक्ष वाढतील.

   निसर्ग उद्यानात मियावाकी प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे. यासोबत नवी मुंबईत ज्वेल ऑफ नवी मुंबईसह नऊ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ज्वेलमध्ये ४० ते ५० हजार झाडे लावू शकतो. यासह तिसरा प्रोजेक्ट एक दोन किलोमीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात करण्याचा मानस आहे. त्यासह वाहतूक बेटे व उद्यानांमध्ये मियावाकी तयार करण्यात येणार आहेत. शहराचे वातावरण सुधारण्यास व जैवविविधता वाढण्यास मदत होईल.

   - अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

  ग्रीन यात्रा संस्थेचे कार्य-  मुंबई, नवी मुंबईसह देशात विविध ठिकाणी ग्रीन यात्रा संस्थेने २० ते २५ मियावाकी प्रोजेक्ट उभारले आहेत. त्यांचा नवी मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाव्यतिरिक्त १० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. सध्यासंस्थेचे नवी मुंबई, मुंबईसह १५ ते २० प्रोजेक्ट सुरू आहेत.या प्रोजेक्टसाठी कोणतीही फी न आकारता कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हे प्रोजेक्ट उभारले जातात. देशात हरित पट्टे वाढवणे हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून संस्था कार्य करत आहे. मियावाकी प्रकल्पासाठी कमीत कमी २०० स्केअर मीटरचे क्षेत्र लागते.