आता लक्ष्य १५ ते १८ व बूस्टर डोसचे! नवी मुंबई पालिका लसीकरणासाठी तयार ; सोसायट्यांमध्ये देखील होणार लसीकरण

नवी मुंबई महानगरपालिकेने जलद गतीने लसीकरण पूर्ण करण्याकडे कोव्हीड सेंटर्स संख्येत १०१ पर्यंत वाढ करून सुरुवातीपासूनच काटेकोरपणे लक्ष दिले आहे. १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका होती.

    नवी मुंबई : कोव्हीड व्हेरियंटचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोव्हीड लसीकरणाव्दारे जास्तीत जास्त नागरिक संरक्षित व्हावेत यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. १० जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांनाही “प्रतिबंधात्मक डोस” दिला जाणार आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने बैठक घेतली. या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके उपस्थित होते.

    नवी मुंबई महानगरपालिकेने जलद गतीने लसीकरण पूर्ण करण्याकडे कोव्हीड सेंटर्स संख्येत १०१ पर्यंत वाढ करून सुरुवातीपासूनच काटेकोरपणे लक्ष दिले आहे. १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका होती. त्यानंतर दुस-या डोसच्या पूर्णत्वाकडेही विशेष लक्ष देत लसीकरणाला वेग देण्यात आला असून ८५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत.नव्याने समाविष्ट होणा-या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पहिला डोस त्याचप्रमाणे दोन्ही डोस पूर्ण झालेले आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे आणि सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांना “प्रतिबंधात्मक डोस” देण्याबाबत नवीन सेंटर्स सुरु करण्याचे नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

    सोसायट्यांमध्ये देखील होणार लसीकरण

    त्यासोबतच सोसायट्यांमध्ये जाऊनही लसीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सध्या कार्यान्वित नसलेल्या कोव्हीड केअर सेंटर्सचाही उपयोग लसीकरणासाठी करण्याबाबत विचार करण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची पथके पाठवून लसीकरण करण्याबाबत सांगोपांग विचार करावा व नियोजन करावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. सर्व महापालिका रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वेबसंवादाव्दारे घेतल्या जाणा-या नियमित बैठकीमध्ये आयुक्त या नवीन लसीकरणाविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत. तत्परतेने लसीकरण करून घेण्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत.

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनीही विहित वेळेत लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर करावा.

    अभिजित बांगर,आयुक्त, नवी मुंबई महापालिका