award to navi mumbai

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’(Swachh Survekshan 2021) मध्ये नवी मुंबई शहरास १० ते ४० लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (Navi Mumbai Tops In Swachh Survekshan 2021)बहुमान प्राप्त झाला आहे.

  नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’(Swachh Survekshan 2021) मध्ये नवी मुंबई शहरास १० ते ४० लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र(Maharashtra) राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई(Navi Mumbai Tops In Swachch Survekshan 2021) नंबर वनचे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी दिल्ली(New Delhi) येथील विज्ञान भवन येथे आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ विशेष समारंभात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते, केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकारला.

  नवी मुंबई पालिकेस या विशेष समारंभात आणखी तीन महत्वाचे सन्मान प्राप्त झाले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात देशात व्दितीय तर; कचरामुक्त शहरांमध्ये नवी मुंबई पालिकेने  फाईव्ह स्टार मानांकन कायम राखले आहे. तर ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास ‘वॉटर प्लस’ या सर्वोच्च मानांकनाने सन्मानीत करण्यात आले.

  या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपायुक्त  दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशन कक्ष विभागांचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ २ उपायुक्त अमरीश पटनिगेरे उपस्थित होते.

  ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ ला सामोरे जाताना ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे घोषवाक्य तयार केले आहे. रस्ते दत्तक योजना, शून्य कचरा झोपडपट्टी, गावठाण व सेक्टर संकल्पना तसेच पेट कॉर्नर व असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.

  - अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

  स्वच्छ सर्वेक्षणात देशभरातील ४,३२० शहरे सहभागी झाली होती. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणा-या देशातील ९ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील ‘फाईव्ह स्टार मानांकन’ प्राप्त एकमेव शहर ठरले आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) ‘वॉटरप्लस’ हे सर्वोच्च मानांकन मिळविणाऱ्या देशातील ९ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. यावर्षी ‘स्वच्छ सर्वंक्षण २०२१’ मध्ये  तिमाही कालावधीच्या ३ सत्रांत कागदपत्रे तपासणी तसेच नागरिकांचे अभिप्राय या पद्धतीने परीक्षण करण्यात आले. याशिवाय केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांव्दारे पूर्वकल्पना न देता पालिका क्षेत्रातील स्थळांची ३ वेळा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कोणत्याही नागरिकाशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वच्छता ॲप, दूरध्वनी यावरूनही कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून शहर स्वच्छता विषयक प्रतिक्रियांची नोंद घेण्यात आली होती.

  शहर सौंदर्याच्या विविध कल्पना
  नवी मुंबई पालिकेने क्षेत्रात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या होत्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणाऱ्या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, महत्त्वाच्या चौकातील लक्षवेधी शिल्पाकृती, विद्युत दिपांनी उजळलेले उड्डाणपुल, अंडरपास व विद्युत खांब, स्वच्छ तलाव काठांवर विलोभनीय चित्रे, तलावात आकर्षक प्रकाश योजना, चौकातील कारंजे या आकर्षक बाबी ठरल्या.

  नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी काठावर बसविलेल्या जाळ्या व नाल्यांच्या प्रवाहात कचरा अडवण्यासाठी प्रवाहात लावण्यात आलेल्या नेट या दोन महत्वाच्या उपाययोजनांमुळे नाले स्वच्छ रहात असल्याचे दिसून आले.  याचीही दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. कचरा घरातच वर्गीकरण, कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी. तंत्रप्रणाली राबविण्यात येत आहे. कोरोनाग्रस्त विलगीकरणात असलेल्या घरांतील कचरा सुरक्षितपणे संकलित करून त्याची विल्हेवाट ही त्याच सुरक्षित पध्दतीने लावली जात आहे. तुर्भे एम.आय.डी.सी. येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी खत व प्लास्टिक ग्रॅन्युल्स तसेच फ्युएल पॅलेटस् निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. त्यात डेब्रिजच्या सुयोग्य विल्हेवाटीसाठी सी अँड डी वेस्ट प्लान्ट कार्यान्वित करण्यात आला आहे. शहरातील मोठ्या सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, उद्योग समूहांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून खत प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. नवी मुंबई पालिकेच्या सर्व शाळा तसेच उद्यानांमध्येही खत प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. ५ झोपडपट्ट्यांमध्ये यशस्वीपणे ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. दोन ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात बसविण्यात आलेल्या भूमीगत यांत्रिकी कचराकुंड्याना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

  जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त रितीने बंद करून त्यावर ‘स्वच्छता पार्क’ ही अभिनव संकल्पना साकारली आहे. शहरातील दैनंदिन साफसफाईचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी राबविलेली ‘स्मार्ट वॉच’ संकल्पना उपयोगी सिद्ध झालेली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक व सामुदायिक शौचालये गुगल मॅपवर सहजपणे उपलब्ध आहेत. शौचालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. २१ ई टॉयलेटपैकी विशेष सुविधांसह महिलांकरिता स्वतंत्र  शी टॉयलेटही कार्यरत आहेत. दिव्यांग व लहान मुलांसाठी शौचकुपांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी तेथील स्वच्छता व अनुषांगिक बाबींवर नागरिकांना अभिप्राय देण्यासाठी क्यू आर कोड प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेविषयीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी विशेष तक्रार निवारण प्रणाली करून त्याचे  २४ तासात निराकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शौचालयांमध्ये पायाने वापर करावयाचे सोप डिस्पेन्सर ठेवण्यात आले आहे. यंदाचा ‘२१ डेज चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम अत्यंत लोकप्रिय झाला. केंद्रीय सचिव  दुर्गाशंकर मिश्रा यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.  याशिवाय स्वच्छ सोसायटी – रुग्णालय – शाळा महाविद्यालय – हॉटेल्स अशा स्पर्धा, स्वच्छता मोहिमा यशस्वी होत आहेत.

  सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने जुनी पादत्राणांचा पुनर्वापर करण्याच्या ‘ग्रीन सोल’ या अभिनव संकल्पनेला उत्तम प्रतिसाद लाभला. ‘प्लास्टिमॅन’ ही सॅशे, चॉकलेट रॅपर्स, पिशव्यांचे कापले जाणारे तुकडे अशा तुकड्यांच्या स्वरूपातील प्लास्टिक बाटल्यांमध्ये संकलित करण्याच्या मोहीमेचीही प्रशंसा झाली.