painted wall in navi mumbai

नवी मुंबई चित्रांमुळे सजू लागली असताना दुसऱ्या बाजूने नागरिकांची जबाबदारी देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे पान, मसाले, तंबाखू व गुरखे खाऊन आतातरी थुंकणे थांबवा(stop spitting), कलाकारांची कदर करा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने(navi Mumbai corporation) स्वच्छ सर्वेक्षणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षांपासून पालिकेने भित्तीचित्रे रंगवून संपूर्ण शहर बोलके(paintings on wall) केले आहे. यापूर्वी शहरात उद्यानात असलेले सेल्फी पॉईंट संपूर्ण शहरात तयार झाले आहेत. यंदा थेट जे जे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनाच भित्तीचित्रे रेखाटण्यासाठी पालिकेने पाचारण केले आहे. एकाबाजूने विद्रुप झालेल्या निर्जीव भिंतींना बोलक्या रेषांनी जिवंतपणा आला आहे. एकाबाजूने नवी मुंबई सजू लागली असताना दुसऱ्या बाजूने नागरिकांची जबाबदारी देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे पान, मसाले, तंबाखू व गुरखे खाऊन आतातरी थुंकणे थांबवा(stop spitting), कलाकारांची कदर करा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक पटकवण्यासाठी पालिका सरसावली आहे. शहर स्वच्छतेसोबत नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी विविध उपायांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. पालिकेकडून नागरिकांसाठी अडथळा मुक्त पदपथ तयार करून चालणे सुलभ केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूस नागरिकांकडून मात्र या पदपथांवरून चालताना अस्वच्छतेचे अडथळे आणले जात आहेत. भिंतींवर थुंकून भिंती अस्वच्छ करण्यात येत असल्याने महापालिकेने शहरातील सर्व भिंतीच रंगवण्याची कल्पना अंमलात आणण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार भिंती आकर्षक चित्रांनी सजवल्या जात आहेत. यंदाही या भिंती विविध चित्रांनी रंगवल्या जात आहेत.

जे जे स्कुल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांची यासाठी खास निवड करण्यात आली आहे. तासनतास एकाजागी बसून आपले कसब पणाला लावून भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. त्यात आकर्षक रंगांची उधळण करत त्यात जिवंतपणा ओतला जात आहे.

नवी मुंबईकरांकडून या कल्पनांचे कौतुक होत असले तरी काही नतद्रष्ट नागरिकांकडून मात्र या स्वच्छतेला हरताळ फासला जात आहे. या सुंदर चित्रे अनेककांकडून थुंकून घाण करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तंबाखू, पान, मसाला, गुटख्याच्या लाल पिचकाऱ्या उठलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे पालिकेचे प्रयत्न वाया जात आहेत.

निदान ही सुंदर चित्रे रेखाटल्याने तरी थुंकणाऱ्यांना प्रतिबंध घालता येई, ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रयत्नशील असली तरी काही जणांकडून यात विघ्न आणण्याचे प्रकार दिसून येत आहेत. मात्र निदान या थुकणाऱ्यांनी दिवसभर राबून तासनतास एकाजागेवर बसून आपले कसब पणाला लावत कल्पनातीत कलाकृती साकारणाऱ्या कलाकारांची कदर करणे गरजेचे आहे.

 आजाराने शिकवली स्वच्छता

सध्या कोरोनाच्या काळात आपल्या थुंकीतून पसरणाऱ्या आजारातून समस्त मानवजातीला धडा मिळाला आहे. यातून मनुष्याने या रोगातून वाचण्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात केल्या असल्या तरी थुंकण्याचे व्यसन असलेल्या नागरिकांकडून लॉकडाऊननंतर या सवयींना देखील बगल देत अस्वच्छता पसरवली जात आहे. याबाबत शहरभर चितारलेली मुक्ती भित्तीचित्रेच जागरूकतेचे प्रभावी कार्य करत आहेत.

painted wall

भिंती झाल्या बोलक्या

या भित्तीचित्रांतून नवी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणा रेखाटण्यात आल्या आहेत. भूमिपुत्रांना लक्षात घेऊन आगरी कोळी समाज मासेमारी करताना, भात शेती करताना कलाकृती साकारल्या आहेत. नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात घेता भलेमोठे विमान, क्वीन नेकलेस म्हणून गणला जाणार नवी मुंबई शहरातील पामबीच मार्ग व त्यावरील पाम ट्री, पालिका मुख्यालय, नवी मुंबईचे महत्व वाढवणारी मेट्रो, रेल्वे मार्ग, शहराची श्रीमंती दर्शवणाऱ्या उंच इमारतींची सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. हिरवेगार वृक्ष, डोंगर रांगा, विस्तीर्ण खाडी किनारा, फ्लेमिंगो पक्षांचे थवे, विविध पक्षी प्राणी, भला मोठा हत्ती, डोनाल्ड डक, मिकी माउस, छोटा भीम, डोरे मॉन, प्राण्यांची मोठी चित्रे रेखाटत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. अप्लिए कल्पनाशक्ती लढवत या कलाकारांनी चित्रकलेतील आपले कसब पणाला लावून चित्रे रेखाटली आहेत.कोरोनाची पर्शवभूमी लक्षात घेता मास्क वापरणे, कोविड योध्यांच्या सन्मानार्थ डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कामगा, वॉर्ड बॉय यांचीही चित्रे रेखाटली आहेत. तसेच जनजागृतीपर संदेश लिहिण्यात आले आहेत.

नागरिकांची भरभरून दाद

स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. नागरिकांचा प्रतिसाद या प्रकारात पालिका गतवर्षी देशात प्रथम आली होती. त्यात यंदा पालिकेने काढलेली चित्रे ही नागरिकांना भरभरून प्रतिसाद देतील अशीच असल्याने यावर्षीदेखील पालिकेला नामांकन उंचावण्यास मदत होणार आहे.