ठाण्यात लस नाही तर पगार नाही! लसीकरण वाढवण्यासाठी महापौरांची अनोखी शक्कल

ठाण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी ठाणे पालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. ९ नोव्हेंबरपासून ठाण्यात भव्य लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून घरोघरी लसीकरण करण्याचा उद्देश पालिका प्रशासनाने ठेवला आहे. अशी माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली(No vaccine in Thane, no salary! Mayor's unique approach to increase vaccination).

  ठाणे : ठाण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी ठाणे पालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. ९ नोव्हेंबरपासून ठाण्यात भव्य लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून घरोघरी लसीकरण करण्याचा उद्देश पालिका प्रशासनाने ठेवला आहे. अशी माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली(No vaccine in Thane, no salary! Mayor’s unique approach to increase vaccination).

  तसेच पालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांची लसीचा डोस घेतला नाही त्यांचे वेतन थांबवण्यात येणार असल्याचे देखील म्हस्के यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता पालिका कर्मचाऱ्यांना लस घेण्याची सक्ती केली असून, लसीरकरण मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्यात आली आहे.

  ठाणे पालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही किंवा विहित मुदतीनंतरही दुसरा डोस घेतला नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाणार नाही. यासाठी महापालिका अधिकारी /कर्मचारी यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे लागणार आहे. तसेच ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांनाही लसीचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, जर रुग्णाच्या नातेवाईकांचे लसीकरण झाले नसेल तर तात्काळ त्यांना लसीकरण करून घ्यावे लागणार आहे.

  देशासह, राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन १० महिने पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप काही जणांनी लसीकरण करून घेतले नाहीत, तर जणांनी लसी संदर्भात चुकीचा समज करून घेतला असल्याने लसीकरण मोहिमेला प्रतिसाद थंडावला असल्याने लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ठाण्यात घरोघरी लसीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी लसीकरण कॅम्प लावण्यात आले असू त्यासाठी हवा तसा प्रतिसात मिळत नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

  सद्यस्थितीत ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होत आहे, ही निश्चितच शहरासाठी आनंदाची बाब आहे. परंतु ही संख्या वाढू नये किंवा पूर्णपणे कमी व्हावी यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून, संपूर्ण ठाणे शहराचे लसीकरण व्हावे यासाठी ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेस ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.

  हर घर दस्तक’ अंतर्गत मोहीम

  ठाणे पालिकेच्या वतीने शहरात विविध लसीकरण केंद्र, लसीकरण ऑन व्हील, जम्बो लसीकरण केंद्र, आऊट रिच कॅम्पस , बाजारपेठा आदी ठिकाणी नियमित लसीकरण सुरू आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांनी लस घेतलेली नाही. यासाठी ९ नोव्हेंबरपासून व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत ‘हर घर दस्तक’ या उपक्रमातंर्गत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका या घरोघरी जावून लसीकरण न झालेल्या नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत, या दरम्यान ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे या मोहिमेतंर्गत तात्काळ लसीकरण केले जाणार आहे. यासाठी १६७ पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती

  लसीकरणाबाबतची जनजागृती ही शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षक देखील करणार आहेत. आमची शाळा व महाविद्यालय करोना सुरक्षित आहे, तुमचे घर करोना सुरक्षित आहे का? असा संदेश विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविला जाणार असून या माध्यमातून लसीकरणाबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच नागरिकांना लसीकरणाचा संदेश हा ठामपाच्या घंटागाड्यांच्या माध्यमातून देखील दिला जाणार असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

  इमारतीच्या सेक्रेटरींना नोटीस

  लसीकरण मोयशस्वी करण्यासाठी शहरातील इमारतीमध्ये सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे इमारतीच्या सेक्रेटरींना नोटीस देण्यात येणार असून लस घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.