दहावीच्या विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेचे गुण न देणे हा अन्याय,भाजप शिक्षक आघाडीने घेतला आक्षेप

राज्य सरकारने दहावीची परीक्षा(tenth students) देणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण(marks of art) न देण्याचा निर्णय घेतला आहे.

    कल्याण : राज्य सरकारने दहावीची परीक्षा(tenth students) देणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण(marks of art) न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळाने या गुणांसाठी जानेवारी महिन्यातच प्रस्ताव मागवले होते आणि शाळांनी जानेवारी महिन्यात प्रस्ताव पाठवले आहेत. सरकारने घेतलेला हा निर्णय हजारो विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याने कला शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

    चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी, इंटरमिजिएट उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना दहावीमध्ये श्रेणीनुसार अतिरिक्त वाढीव गुण दिले जातात. श्रेणीमध्ये ए श्रेणी सात गुण, बी-पाच, सी-तीन गुण असतात. कोरोनामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्षात परीक्षा घेण्यास मान्यता मिळाली नाही. या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी अनेक महिन्यांपासून शिक्षक मागणी करत होते. परंतु आता ही परीक्षा होणार नाही निश्‍चित झाले आहे. परंतु परीक्षा नाहीत, त्यामुळे गुणही नाहीत असा निर्णय सरकारने घेतला आहे.

    कोवीड संसर्ग, कोवीड प्रादुर्भाव व विद्यार्थी आरोग्याचा विचार करता २०२०-२१ यावर्षी शासकीय रेखाकला परीक्षा न घेणे, दृश्यकला पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेत रेखाकला परीक्षेचे गुण गृहीत न धरणे, एटीडी व फाऊंडेशन अभ्यासक्रमासाठी रेखाकला परीक्षा उत्तीर्णतेच्या अटीमध्ये सूट आणि २०२१-२२ यावर्षी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेखाकला परीक्षा उत्तीर्णतेचा विचार न करणे याबाबतचा २६ मार्च, २०२१ रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे. हा योग्य निर्णय जरी असला तरी दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट केले. परंतु जे विद्यार्थी या परीक्षा आधीच उत्तीर्ण झाले त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागचे म्हणणे आहे.

    अनेक विद्यार्थी नववीपर्यंत दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यामुळे २०२०-२१ मध्ये परीक्षा झाली नाही, म्हणून गुणच न देणे कितपत योग्य आहे. जे विद्याथी २०१९-२० पर्यंत या ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्यावर हा अन्याय करण्यासारखे आहे. सवलतीच्या गुणांसाठीचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले होते. शाळांनी जानेवारी महिन्यातच प्रस्ताव सादर केलेले आहेत. ऐनवेळी राज्य सरकारने सवलतीचे वाढीव गुण न देण्याचा निर्णय घेतला. जो विद्यार्थ्यांवर अन्याय कारक आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकही संभ्रमात असल्याचे गुरुनानक इंग्लिश हायस्कूलचे कला शिक्षक विनोद शेलकर यांनी सांगितले.

    याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सह शिक्षण सचिव यांना ही मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. सरकार निश्चितच विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल, अशी आशा भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.