plastic bag used for vegetable

राज्य शासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर(plastic carrybag) बंदी घातल्यावर धडाकेबाज कारवाई करणारी नवी मुंबई महापालिका(navi mumbai corporation) प्लॅस्टिक पिशव्यांबाबत काहीशी शांत भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे किरकोळ दुकानदार व फेरीवाल्यांचे फावले असून खुलेआम प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने(navi Mumbai corporation) स्वच्छता सर्वेक्षणात यंदा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अद्याप शहर विद्रूप करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा मुख्य घटक असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत(plastic carrybag use in navi mumbai) पालिकेला तोडगा काढता आलेला नाही.

राज्य शासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यावर धडाकेबाज कारवाई करणारी नवी मुंबई महापालिका प्लॅस्टिक पिशव्यांबाबत काहीशी शांत भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे किरकोळ दुकानदार व फेरीवाल्यांचे फावले असून खुलेआम प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहेत. मुख्य म्हणजे सुज्ञ ग्राहकांकडून देखील खुलेआम नियमांचे उल्लंघन करत प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याने पालिकेकडून दुकानदार व ग्राहकांवरदेखील कारवाई करण्याची गरज भासू लागली आहे.

नवी मुंबई पालिकेने आजतागायत प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर न करणाऱ्यांकडून  लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या बंदी घातलेल्या उत्पादन वापरणाऱ्यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. शासनाने प्लॅस्टिक बंदीचा आदेश काढल्यावर महाराष्ट्रातील इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिका कारवाई करण्यात अग्रेसर होती. याबाबत नवी मुंबई महापालिकेचे कौतुक झाले होते. मात्र २०२०-२१ सलासाठी स्वच्छता मोहीम राबवताना मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराबाबत मात्र काहीसे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

कारवाईसाठी पालिकेने विभागनिहाय जबाबदाऱ्या दिल्या आहेत. घनकचरा विभागाकडून स्वच्छतेसाठी हरतऱ्हेचे काम केले जात असले तरी, विभाग कार्यालयाकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराबाबत काहीसे सैल धोरण अवलंबले जात आहे. दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे पालिकेने दुकानदार तसेच वस्तू घेणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाईचा दट्ट्या उगारणे गरजेचे आहे.

प्लॅस्टिक पिशव्या विकल्या जाणारी ठिकाणे –  नवी मुंबईतील डी मार्टचा परिसर, दुकानदार व किरकोळ विक्रेते, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसर, एपीएमसीमधील भाजीपाला व फ्रूट मार्केट, एपीएमसी बाहेर व्यवसाय करणारे विक्रेते, मच्छी व मांस विक्रेते, अनेक हॉटेल्स व चायनीज पदार्थांची दुकाने, मिठाई दुकाने, फळ व भाजी विक्रेते, सिग्नलवर खुलेआम डस्टबीन्स पिशव्या विक्री

सुशिक्षित असूनही अज्ञानासारखे अनेक नागरिक सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. पालिकेने अनेक कार्यक्रम घेऊन जनजागृती सुरू ठेवली आहे. मात्र अनेकदा पालिकेला दोष देणारे व पालिकेकडे बोटं दाखवणारे नागरिक स्वतः मात्र नियमाला बगल देऊन प्लॅस्टिक पिशव्या वापरताना दिसून येत आहेत.

खुलेआम पिशव्यांची पाकिटे विक्रीस
विक्रेत्यांकडून खुलेआम प्लॅस्टिकच वापर केला जात आहे. त्यात प्रत्येक फेरीवाला भागात प्लॅस्टिक पिशव्या पुरवणारे एजंट असून हे एजंट त्या भागातील सर्व विक्रेत्यांना प्लॅस्टिक पिशव्या पुरवण्याचे काम करत आहेत. प्रत्येक विक्रेत्याकडे जाऊन प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री केली जाते. एखाद्या गोडाऊनवर जाऊन छापा मारते. त्यापेक्षा कित्येक पटीने किरकोळ विक्रेत्यांकडून दररोज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. पालिकेने दुकानदार व किरकोळ फेरीवाल्यांकडे लक्ष केंद्रित केल्यास शहर प्लॅस्टिक पिशवी मुक्त होण्यास मदत होईल.

गावठाणातील दुकानांवर कारवाईची गरज
नवी मुंबई शहरांत कारवाई करणाऱ्या पालिकेकडून मात्र गावठाणात मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. पालिकेकडून गावठाणातील दुकानदारांवर कारवाई केली जात नसल्याने प्लॅस्टिक वापरण्याचे सर्वाधिक प्रमाण शहरासोबत गावठाण भागात फोफावले आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात जनजागृतीत भर देण्यात येत आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणात प्लॅस्टिक विरोधी कारवाई करण्यात येत असून विभागनिहाय अशा कारवाया नियमित सुरू आहेत.

- डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा विभाग, नवी मुंबई महानगरपालिका