महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला मंगळवारी सकाळी दाखल केले. मात्र संध्याकाळी तिची तपासणी केल्यानंतर सिझरिंग करावे लागेल. तसेच बाळाला

 कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला मंगळवारी सकाळी दाखल केले. मात्र संध्याकाळी तिची तपासणी केल्यानंतर सिझरिंग करावे लागेल. तसेच बाळाला पेटीत ठेवावे लागले असे रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गरोदर महिलेच्या पतीला सांगत  उल्हासनगरमधील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या महिलेची नॉर्मल डिलेव्हरी झाली असून बाळ स्वस्थ असल्याने त्याला काचेच्या पेटीची आवश्यकता भासली नाही. यातून पुन्हा पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयाचा हा प्रकार काही नवीन नाही. अनेकदा इथे उपचार होणार नाही असे सांगत रुग्ण इतर रुग्णालयात पाठवले जातात. रुग्णांची होणारी परवड थांबणार तरी कधी असा सवाल नागरिक विचारत आहेत.

लक्ष्मी नलका नामक महिलेने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात गरोदर असताना प्रसूतीसाठी नाव नोंदणी केली. सोमवारी दुपारपासून तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिला रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी उपस्थित डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि सांगितले की, बाळाने आईच्या पोटात शी केली आहे, सिझारिंग करावी लागेल, तसेच बाळ स्वस्थ नसेल तर काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, ही सुविधा आपल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नाही तुम्ही उल्हासनगर मधील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिचा पती रविकुमार यांनी इको ड्राइव्ह यंगस्टर्स संस्थेचे महेश बनकर यांच्याकडे मदत मागितली. बनकर यांनी आपल्या मित्राची कार घेऊन उल्हासनगर येथील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कोरोनामुळे त्या रुग्णालयात देखील परिस्थिती गंभीर होती. मात्र महिलेला त्रास होत असल्याने तेथील डॉक्टरांकडून महिलेला दाखल करून घेण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी सिझारिंग सांगण्यात आलेल्या महिलेची रात्री ९ वा. नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यामुळे पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात किती भोंगळ कारभार चालतो हे दिसून आले आहे. अशावेळेस एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात ने आण करताना महिला आणि बाळाला काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न महिलेच्या पतीने उपस्थित केला आहे.

अवाढव्य बांधण्यात आलेले रुक्मिणी बाई रुग्णालय  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णांना सेवा देण्यात कमी पडत आहे. रुग्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची वेळ आजची नसून हे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. कधी कळव्याच्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तर कधी सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जा हे तर रुग्णालायातील नेहमीचाच प्रकार आहे. बिकट परिस्थिती असताना हक्काचे असलेल्या पालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार न मिळाल्याने नाईलाजास्तव जास्तीचे पैसे देऊन खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागते किवा लांबच्या मुंबईकडच्या रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. अनेकदा पालिकेकडून सांगितले जाते. रुक्मिणीबाई रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध आहेत. मात्र वास्तव पाहता अनेक रुग्ण इतर रुग्णालयात पाठवले जातात.