आनंदाची बातमी – कल्याण डोंबिवलीतील दुसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीतील दुसऱ्या ओमायक्रॉन (Second Omicron Patient Got Discharge) रुग्णाला उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महापालिका विलगीकरण कक्षातून शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन (Second Omicron Patient Got Discharge) रुग्णाला उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महापालिका विलगीकरण कक्षातून शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) लसीकरणासाठी करत असलेल्या सर्वेक्षणात ४ जणांचे १ कुटूंब नायजेरियातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास कळल्यानंतर २ डिसेंबर रोजी या चारही जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ३ डिसेंबर रोजी चारही जण आरटीपीसीआर पॉझिटीव्ह आढळून आले. या कुटुंबापैकी पती-पत्नी दोघांचेही कोविड लसीकरणाचे दोन्ही डोसेस झालेले आहेत. उर्वरित दोघांपैकी एक दहा वर्षाचा मुलगा व एक ६ वर्षाची मुलगी आहे. या कुटुंबास महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिम येथील विलगीकरण कक्षात ४ डिसेंबर रोजी दाखल करण्यात येवून त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यापैकी ४५ वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला आहे.

    तथापि या कुटुंबातील चारही व्यक्तींचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल, विलगीकरण कक्षातील उपचाराअंती निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज दुपारी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून डिसचार्ज देण्यात आला आहे. या कुटूंबाचे २४ हाय रिस्क कॉन्टॅक्ट व ६२ लो रिस्क कॉन्टॅक्ट अशा ८६ लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता त्यातील ४ निकट सहवासीत आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले असून त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता कोविड अनुरुप वर्तनाचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.