डोंबिवलीत दुकानदार, व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन; पालिका आयुक्तांच्या निर्णयाला तीव्र विरोध, आयुक्त हटाव दुकाने बचाव अशी जोरदार घोषणाबाजी

पालिका प्रशासनाच्या आदेशानुसारच शनिवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील दुकाने बंद होती. मात्र लोकलमधील वाढती गर्दी, बसमधील गर्दी यावर कोणतेही निर्बंध लागू नाही तसेच दारू विक्रीस परवानगी हॉटेलची पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून दुकानदार व व्यापा-यांना वेठीस धरले जात असून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत शेकडो दुकानदार व व्यापारी याचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर उतरले.

    डोंबिवली : कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवार- रविवार दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्णयाला व्यापारी, दुकानदारांनी तीव्र विरोध दर्शवित डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदेालन केले. यावेळी पालिका आयुक्त हटाव दुकाने बचाव अशी जोरदार घोषणाबाजी केली.

    पालिका प्रशासनाच्या आदेशानुसारच शनिवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील दुकाने बंद होती. मात्र लोकलमधील वाढती गर्दी, बसमधील गर्दी यावर कोणतेही निर्बंध लागू नाही तसेच दारू विक्रीस परवानगी हॉटेलची पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून दुकानदार व व्यापा-यांना वेठीस धरले जात असून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत शेकडो दुकानदार व व्यापारी याचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर उतरले. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात दुकानदारांनी तीव्र रोष व्यक्त केला. चारशे ते पाचशे दुकानदारांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पेालिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    शनिवार रविवार हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे दिवस आहेत केवळ दुकानदांमधूनच कोरोना होतो का ? असा सवाल दुकानदारांनी व्यक्त केला लॉकडाऊनमुळे व्यवसायाला फटका बसला आहे त्यातच पालिकेच्या या निर्णयामुळे खूपच तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष दिनेश गोर आणि डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे सेक्रेटरी दिलीप कोठारी यांनी केली. स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी आंदेालनस्थळी धाव घेऊन व्यापा-यांशी चर्चा केली.

    व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदारांनी सांगितले. दरम्यान इतर शहरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत तेथील व्यापारी प्रशासनाला पाठिंबा देत आहेत त्याचप्रमाणे नागरिकांचे हित लक्षात घेऊन इथल्या व्यापा-यांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी भूमिका पालिका प्रशासनाकडून व्यक्त केली आहे.