नवी मुंबईत विशेष दक्षता पथकांची धडाकेबाज कारवाई ; २ दिवसात २ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संरक्षक ढालीसारखे काम करणा-या मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे नागरिकांकडून काटेकोर पालन करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून याविषयी नागरिकांना विविध माध्यमांतून जागरूक करण्यासोबतच या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून वैयक्तीक आणि सामाजिक आरोग्याला बाधा पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांना समज म्हणून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    सिद्धेश प्रधान / नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये १० मार्चपासून लक्षणीय वाढ होताना दिसत असून कोव्हीड १९ प्रतिबंधासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यासोबतीनेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संरक्षक ढालीसारखे काम करणा-या मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे नागरिकांकडून काटेकोर पालन करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून याविषयी नागरिकांना विविध माध्यमांतून जागरूक करण्यासोबतच या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून वैयक्तीक आणि सामाजिक आरोग्याला बाधा पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांना समज म्हणून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    या कारवाया अधिक प्रभावीपणे करण्यासाठी १५५ जणांचा समावेश असणारी विशेष दक्षता पथके सर्व विभागांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली असून प्रत्येक पथकात 5 कर्मचारी अशा 31 पथकांमार्फत कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर धडक कारवाई केली जात आहे. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्राकरिता सकाळी १ व रात्री १ अशी २ पथके त्याचप्रमाणे कोरोना प्रसारचा संभाव्य धोका असणा-या एपीएमसी मार्केटकरिता ५ पथके सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. या विशेष दक्षता पथकांनी आपल्या कारवाईस धडाकेबाज सुरूवात केलेली असून २१ व २२ मार्च अशा दोनच दिवसात ७४९ जणांवर कारवाई करीत २३ लाख ३८ हजार ४०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.

    १० ऑगस्ट पासून २२ मार्चपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मास्क, सुरक्षित अंतर, थुंकणे अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या ३० हजार २४४ व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून एकूण १ कोटी ३२ लक्ष ५० हजार ६५० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये आधीची पोलीसांसह नियुक्त दक्षता पथके सद्यस्थितीत कार्यरत आहेतच. याव्यतिरिक्त मुख्यालय स्तरावरून परिवहन व्यवस्थापक यांच्या नियंत्रणाखीली नियुक्त ही विशेष दक्षता पथके यांचेमार्फत विभागांतील लग्न व इतर समारंभांतील संख्या मर्यादा तसेच रेस्टॉरंट, बार याठिकाणी कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावरही बारीक लक्ष असणार असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या विशेष दक्षता पथकांमार्फत प्रभावी कामगिरी केली जाणार आहे.

    कोव्हीड सुरक्षा नियम मोडणा-या नागरिकांक़डून दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नागरिकांना कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे. हे विशेष दक्षता पथक स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश असून नागरिकांनी कोरोनाचा वाढता धोका ओळखून गाफील न राहता कोव्हीड सुरक्षा नियमांचे व त्रिसूत्रींचे काटेकोर पालन करावे.

    अभिजीत बांगर आयुक्त नवी मुंबई महापालिका