कोरोनामुळे केडीएमसी क्षेत्रात शनिवार रविवारी कडक निर्बंध; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद

शहरातील फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांनाही शनिवारी रविवारी पूर्णपणे मज्जाव राहणार आहे. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टारंट, बारला काऊंटरवर पार्सल सेवा देता येणार आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. ही बाब लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यत दर शनिवार रविवारी महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.

    अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जीवनावश्यक वस्तू, मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा, किराणा, दूध व वृत्तपत्रे, पेट्रोलपंप वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरातील फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांनाही शनिवारी रविवारी पूर्णपणे मज्जाव राहणार आहे. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टारंट, बारला काऊंटरवर पार्सल सेवा देता येणार आहे. डी मार्ट आणि मॉल्स देखील ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.

    होळी साजरी करण्यावर महापालिकेने र्निबध लादले आहेत. त्यामुळे जर कोणी सोसायटीच्या आवारात होळी अथवा रंग पंचमी साजरी करणार असतील तर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जाईल. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.