ठाणे जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने ? ‘इतक्या’ रुग्णांची दिवसभरात नोंंद

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा(thane district corona patients) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून मंगळवारी एका दिवसात ठाणे जिल्ह्यात २ हजार ५३८ रुग्ण नव्याने आढळून आले . तसेच ११ जणांचा मृत्यू झाला.

  ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून मंगळवारी एका दिवसात ठाणे जिल्ह्यात २ हजार ५३८ रुग्ण नव्याने आढळून आले . तसेच ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ९३ हजार १५४ झाली असून एकूण मृत्यू ६ हजार ४०३ झाले आहेत तर २ लाख ६८ हजार ९१८ रुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे ठाण्यात एका दिवसात ७७५ तर कल्याण डोंबिवलीत ७११ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनकडे सुरु असल्याचे दिसत आहे.

  मंगळवारी ठाणे पालिका परिसरात ७७५, कल्याण डोंबिवली महापालिका परिसर ७११, नवी मुंबई पालिका परिसर ४५६ , मीरा भाईंदर १७० , उल्हासनगर १२३ , भिवंडी पालिका परिसर ३९ , बदलापूर कुळगाव परिसर ११२ , अंबरनाथ १०६ आणि ग्रामीण परिसरात ४६ नवे रुग्ण आढळून आले.

  दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजविले आहेत. ठाण्यातील कोविड रुग्णालये आता ‘हाऊस फुल्ल’ होऊ लागली आहेत. मंगळवारी दिवसभरात ठाणे शहरात ७७५ तर कल्याण- डोंबिवलीमध्ये सुमारे ७११ रुग्ण आढळले आहेत.

  एकीकडे हे निर्बंध लादण्यात येत असतानाही ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. कोरोना रूग्णांचा आकडा ७० हजार १८० वर पेाहचला असून, १४३१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केडीएमसीत ७११ रूग्ण आढळून आले असून, ३ रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. सध्या ५१५५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंतची रूग्ण संख्या ७१ हजार ९७१ असून, १२३३१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

  दरम्यान, वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली आहे. नाट्यगृह आणि सभागृहांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.तसेच याबाबतचे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

  नाट्यगृह आणि सभागृह एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनेच चालवावीत; मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये; प्रवेश देताना प्रत्येकाचे तापमान तपासूनच प्रवेश द्यावा; हँड सॅनिटायझर,मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगबाबत योग्य ती दक्षता घ्यावी; नाट्यगृह अथवा सभागृहांचा उपयोग कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला जाऊ नये; या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित नाट्यगृह अथवा सभागृह हे केंद्र शासनाकडून कोरोनाचे पूर्णत: निर्मूलन झाल्याचे जाहीर होत नाही.तोपर्यंत बंद ठेवले जाईल. तसेच संबंधित मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल,असा इशारा ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.