नोटीस बजाविलेल्या जाहिरात कंपनीसाठी ठाणे महापालिकेचे रेड कार्पेट!

अहमदाबाद महापालिकेने तब्बल ५० नोटिसा बजाविल्याने बदनाम झालेल्या कंपनीला तब्बल १५ वर्षाच्या काळात दरवर्षी १ कोटी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले (Sanjay Waghule) यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अहमदाबाद महापालिकेकडून सत्य स्थिती जाणून घेण्याची विनंती गटनेता वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

ठाणे  : अहमदाबाद महापालिका (Ahmedabad Municipal Corporation) क्षेत्रातील जाहिरात फलकांच्या सर्वेक्षणाबरोबरच महसूलवाढीत अपयशी ठरलेल्या एका जाहिरात कंपनीला ठाणे महापालिकेने रेड कार्पेट (Thane Municipal Corporation’s red carpet for the advertising company)  अंथरले आहे. अहमदाबाद महापालिकेने तब्बल ५० नोटिसा बजाविल्याने बदनाम झालेल्या कंपनीला तब्बल १५ वर्षाच्या काळात दरवर्षी १ कोटी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले (Sanjay Waghule) यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अहमदाबाद महापालिकेकडून सत्य स्थिती जाणून घेण्याची विनंती गटनेता वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. जाहिरात विभागाचे संपूर्ण काम ऑनलाईन, जाहिरात फलकांच्या परवानगीसाठी संगणक प्रणाली आणि शहरातील जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम एका जाहिरात कंपनीला देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

पुणे येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने अहमदाबाद महापालिकेत काम केले. त्यातून अहमदाबाद महापालिकेचे उत्पन्न चार वर्षांत १४८ कोटी ७८ लाखांवर पोचल्याचा कंत्राटदाराने केलेला दावा ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने मान्य केला आहे. त्यानुसार या जाहिरात कंपनीला पीपीपी तत्वानुसार काम सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी १५ लाख रुपये, ऑनलाईन संगणक प्रणाली तयार केल्यानंतर १० लाख रुपये आणि दरमहा देखरेख व अहवालांसाठी दरमहा १० लाख रुपये आणि पुढील १५ वर्षांसाठी प्रती वर्षी ५ टक्के वाढीने रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर वाढलेल्या महसूलाच्या रक्कमेवर प्रतिवर्षी १० टक्के वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. या कंपनीला महापालिकेकडून ५०० चौरस फूट जागाही १५ वर्षांसाठी दिली जाणार आहे. या प्रस्तावानुसार संबंधित कंपनीच्या तिजोरीत वार्षिक किमान १ कोटी २० लाख रुपये जमा होणार आहेत.

भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी अहमदाबाद महापालिकेकडून मिळविलेल्या कागदपत्रांनुसार, संवंधित कंपनीला कामात कसूर केल्याबद्दल तब्बल ५० वेळा कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तर ८ वेळा दंड ठोठावण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. संबंधित कंपनीमुळे अहमदाबाद महापालिकेच्या जाहिरातीच्या उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नसल्याचे अहमदाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर गेल्या चार वर्षांत अहमदाबाद महापालिकेने संबंधित कंपनीला १ कोटी ६४ लाख ४७ हजार ८५५ रुपये प्रदान केले असल्याचे स्पष्ट केले आहे.

या कागदपत्रांवरून संबंधित कंपनीकडून ठाणे महापालिकेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे. अहमदाबाद महापालिकेच्या जाहिरात उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नसताना, कोणत्या आधारावर ठाणे महापालिकेकडून संबंधित कंपनीला रेड कार्पेट अंथरले जात आहे, असा सवालही  वाघुले यांनी केला. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने अहमदाबाद महापालिकेकडून वस्तूस्थिती जाणून घ्यावी. संबंधित कंपनीला बजाविण्यात आलेल्या ५० कारणे दाखवा नोटिसा व ८ दंडाच्या नोटिसांचा अभ्यास करावा. त्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी मागणी संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

पेपरलेस कारभार पण, कंपनीला हवी मोफत ५०० चौ. फूट जागा

ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाचा कारभार पेपरलेस करण्याचे आश्वासन संबंधित कंपनीने दिले आहे. मात्र, या कंपनीला ठाणे महापालिकेकडून संगणकीय प्रणालीसाठी १५ वर्षांसाठी ५०० चौरस फूट जागा मोफत हवी आहे, याकडे गटनेते संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढण्याआधीच संबंधित कंपनीला काम सुरू करण्यासाठी २५ लाख रुपये दिले जात आहेत. या कंपनीवर एवढी मेहेरनजर का टाकली जात आहे, असा सवालही वाघुले यांनी केला आहे.

जाहिरात फलकांना नवी जागा शोधणार कुठे?

ठाणे महापालिकेने शहरातील ५० महत्वाचे चौक व परिसर, महत्वाच्या रस्त्यांवर ५० ठिकाणी शौचालयांच्या बदल्यात जाहिरात फलक, मोबाईल व्हॅन आदींना जाहिराती करण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. जाहिरात महसूल मिळवून देणाऱ्या एकाच रस्त्यावर दोन ठिकाणी दिशादर्शक फलक उभारून जाहिराती केल्या जात आहेत. महत्वाचे रस्ते होर्डिंग व जाहिरात फलकांनी व्यापले आहेत. अशा परिस्थितीत नवी जागा शोधणार कुठे? या जाहिरातींचा महसूल खाजगी कंत्राटदारांच्या खिशात जात आहे. तर पालिकेला अत्यल्प महसूल मिळत आहे. मात्र, कोट्यवधींचे कंत्राट बहाल करण्यासाठीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जाहिरातींसाठी नव्या जागा शोधण्याची टूम काढली आहे, असा आरोप गटनेते संजय वाघुले यांनी केला.