दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला मिळणार इतक्या लाखांचे बक्षीस

    ठाणे : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे तब्बल दोन वर्ष सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे इतर सणांप्रमाणेच तरुणांना उत्साहित करणारा दहीहंडीचा सण देखील साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा कोरोना आटोक्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गणेशोत्सवासह (Ganeshchaturthi) दहीहंडी (Dahihandi festival) उत्सवावरील सर्व निर्बंध शिथिल केल्याने ठाणे शहरातील गोविंदा पथक पथकांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. त्यातच आता ठाणे शहरात मानाचा दहीहंडी उत्सव समजला जाणाऱ्या संस्कृती प्रतिष्ठान तर्फे दहीहंडीचा विश्वविक्रम (world record) मोडणाऱ्या पथकाला २१ लाखांचे (21 lakhs) बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

    गोपाळकाला निमित्त शहरात आयोजित केल्याजाणाऱ्या मोठमोठ्या बक्षिसांच्या आणि मानाच्या दहीहंडी सोहोळ्यांमुळे ठाणे शहराला गोविंदांची पंढरी अशी ओळख प्राप्त झाली आहे. दरवर्षी दहीहंडी सोहोळ्यात उंचच उंच थर रचून हंडी फोडण्यासाठी मुंबई, नवीमुंबई, पालघर, ठाणे, रायगड इत्यादी जिल्ह्यातून अनेक गोविंदा पथक ठाण्यात दाखल होत असतात. वर्तकनगर, टेंबी नाका, जांभळीनाका, गोकुळ नगर, नौपाडा येथील भगवती मैदान या ठिकाणी होणाऱ्या मानाच्या दहीहंडी सोहोळ्यात सहभागी होऊन गोविंदा पथक बक्षिसे आणि सन्मान चिन्ह पटकावतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतील जय जवान पथकाने ९ थरांची दहीहंडी लावत विश्वविक्रमाशी बरोबरी केली होती. मात्र त्यानंतर थरांवर लावण्यात आलेले निर्बंध, कोरोना संसर्ग इत्यादींमुळे हा विश्वविक्रम मोडीत काढण्याची संधी दहीहंडी पथकांना मिळाली नव्हती. परंतु आता हा विश्वविक्रम मोडीत काढण्याची सुवर्ण संधी पथकांसमोर चालून आली आहे.

    मंगळवारी संस्कृती युवा प्रतिष्ठानने ठाण्यात दहीहंडी उत्सव आयोजना संदर्भांत पत्रकार परिषद घेत यंदा ठाणे शहरात (Thane) होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाबाबत माहिती दिली. ठाणे शहरात संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि शिवसेना यांच्या तर्फे वर्तकनगर येथे उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यंदा दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला २१ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्सवात येणाऱ्या प्रत्येक पथकाला थराप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. तेव्हा यंदा दहीहंडीचा विश्वविक्रम मोडीत काढून दहा थरांची दहीहंडी कोणता पथक रचणारा हे पाहण औसुक्याच ठरणार आहे.

    दोन वर्षांनी दहीहंडी उत्सव मुक्तपणे साजरा करता येणार आहे. त्यामुळे राज्यभरात सर्व आयोजकांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे आणि हा हिंदुत्वाचा उत्सव जल्लोषात साजरा करावा, असे प्रताप सरनाईक (आमदार आणि दहीहंडी आयोजक) यांनी सांगितले.