nrc chimney demolished

आंबिवली स्टेशनच्या शेजारी असलेल्या एनआरसी कंपनीमधील ५० मीटर उंचीची चिमणी(chimney demolished in kalyan) टिटवाळा रोडवरील रहदारीला आणि आंबिवली स्टेशनवरील प्रवाशांसाठी धोकादायक झाली होती. ती आज सर्व सुरक्षेचे उपाय करून पाडण्यात आली.

    कल्याण : आंबिवली स्टेशनच्या शेजारी असलेल्या एनआरसी कंपनीमधील ५० मीटर उंचीची चिमणी(chimney demolished in kalyan) टिटवाळा रोड वरील रहदारीला आणि आंबिवली स्टेशनवरील प्रवाशांसाठी धोकादायक झाली होती. ती आज सर्व सुरक्षेचे उपाय करून पाडण्यात आली.

    आरसीसीचे बांधकाम असलेली चिमणी ज्यावेळी एनआरसी कपंनीचा प्रकल्प सुरु झाला त्यावेळी म्हणजे १९५० साली बांधण्यात आली होती. पण २००९ साली कपंनी बंद पडली तेव्हापासून ती धोकादायक झाली होती. चिमणीची या काळात वाताहत झाली होती. रेल्वे, केडीएमसी व खडकपाडा पोलीस स्टेशन या सर्व संबंधित यंत्रणांनी ही चिमणी पाडण्यासाठी वेळोवेळी नोटीसा बजावल्या होत्या. एनआरसी कंपनी विरोधात एनसीएलटीमध्ये २०१८ मध्ये दिवाळखोरी संहितेखाली दावा दाखल करण्यात आला. मार्च २०२० मध्ये एनसीएलटीने दिलेल्या निकालानुसार अदाणी समूहाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर २०२० मध्ये कंपनीचा ताबा घेतला.

    त्यानंतर एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने ही धोकादायक चिमणी तात्काळ पडण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला. अदानी समूहाच्या प्रकल्प टीमने ही चिमणी पोलीस, केडीएमसी व एमईसीबी यांच्या सहकार्याने ही चिमणी उतरवली. यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी टिटवाळा-आंबिवली रस्ता बंद केला होता व परिसरात सतत दोन दिवस गस्त घालून जनजागृती केली. ही चिमणी खाली आल्यावर रेल्वे व केडीएमसी अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

    कंपनीच्या आवारातील अन्य २ आरसीसी चिमण्या व चार स्टीलच्या चिमण्याही लवकरच पाडण्यात येणार असून याठिकाणी अदानी समूहाकडून जागतिक दर्जाचं लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी रेल्वे व केडीएमसी सोबत चर्चा सुरु केली असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले.