kolhapur mahalaxmi

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. मात्र अंबाबाईचं सौंदर्य कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या (kolhapur) अंबाबाईच्या (Ambabai) मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी पुरातत्व खात्याकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे की काय अशी शंका निर्माण झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीला स्नान घालणं आणि दुग्धाभिषेक करणं बंद करण्यात आलं आहे. मूर्तीची अवस्था सध्या अत्यंत नाजूक (Kolhapur Ambabai Idol) झाली आहे. मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. मात्र अंबाबाईचं सौंदर्य कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मूर्ती काही ठिकाणी भग्न
अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने आता त्याची झीज होत आहे. तर मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. मात्र मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये असं सांगितलं जातं. मात्र कित्येक वर्ष अंबाबाईची मूर्ती अभिषेक न घालताच पुजली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन दिलं जात आहे.

अंबाबाईच्या मूर्तीची झीज
गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागाकडून मूर्तीला वज्रलेख आणि रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन केलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट – सप्टेंबर दरम्यान देवीच्या ओठांना झालेली दुखापत लपवण्याठी तातडीने 18 आणि 19 सप्टेंबर रोजी एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर देवीच्या चेहऱ्यावरील भावचं बदलले. त्यानंतर 26 जानेवारीला देवीच्या मूर्तीचा डाव्या कानाजवळील भाग निघाला. त्यामुळे श्रीपुजकांनी ही बाब 27 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टाने या संदर्भात 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली. पण बेजबाबदार सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मुर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.

सर्व अलंकार अस्पष्ट
सध्या देवीची मूर्ती अत्यंत नाजूक स्थितीत असून देवीच्या पानपात्राचा जो हात आहे, त्या हाताची दोन बोटं झिजली आहेत. तर म्हाळंग घेतलेल्या उजव्या हाताच्या बोटाचीही पूर्ण झीज झाली आहे. तसंच पावलावरील बोटं पूर्णपणे निघून गेली आहेत. देवीचं वाहन असलेल्या सिंहाच्या मूर्तीची पाठीमागील बाजू दिसेनाशी झाली असून सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. देवीच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट झाले आहेत. या सगळ्या गोष्टी पाहता आता सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

अंबाबाई मूर्ती संवर्धन आणि वज्रलेपाचे अनेक वेळा प्रयत्न केले गेले आहेत. 1920 साली मूर्तीच्या हातावर तांब्या पडला आणि दुखावला पण तेव्हापासून तो हात तसाच जोडून ठेवला आहे. मूर्तीची संवर्धन प्रक्रिया अमलात येण्यासाठी 2015 पर्यंत वाट बघावी लागली. आता पुन्हा मूर्तीचे भाग झिजू लागले आहेत.