kolhapur ambabai dasara puja

कोल्हापूरच्या अंबाबाईची (Ambabai) विजयादशमीला (Dasara 2022) रथारूढ रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली.

    कोल्हापूर : विजयादशमीला (Dasara 2022) करवीर निवासिनी अंबाबाईची (Ambabai) रथारूढ रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली. गजानन मुनीश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी ही पूजा (Navaratri 2022) बांधली. प्रत्येक जीव स्वतःच्या अशा काही मर्यादा घालून घेत असतो. प्रयत्न केला तर त्या मर्यादा ओलांडून प्रगतीचे नवे शिखर साध्य करता येते. याचा संदेश देणारा उत्सव म्हणजे विजयादशमी. सीमोल्लंघनाची इच्छा प्रत्येकाची असते, पण त्यासाठी योग्य दिशा आणि पाठिंब्याची गरज असते.

    बंधन झुगारण्यासाठी एका समर्थ शक्तीची आवश्यकता असते. ती शक्ती म्हणजे विजयाची शाश्वती आणि असा नित्य शाश्वत विजय जिला शक्य आहे अशी एकमेव शक्ती म्हणजे जगदंबा. भक्त भाविकांना मार्ग दाखवण्यासाठी स्वतः असीम महालक्ष्मी रथारूढ होऊन आज शिलंगणासाठी सजली आहे. जगदंबा नारायणीचा हात धरून आपण ही आपण आखलेल्या आपल्या भोवतालची खुरटी कुंपण ओलांडून पुढे जाऊ आणि जगद्व्यापक जगदंबेची अखंड कृपा अनुभवू.

    कोल्हापूर शाही दसरा महोत्सव यंदा राज्य सरकारच्या सहभागाने भव्य स्वरुपात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दुसरीकडे तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम मोडित निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये २५ लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील अशा अंदाजाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये २३ लाख ३१ हजार ६०४ भाविकांनी भेट दिली.