अवघे १४ लाख टन उसाचे गाळप, कोल्हापूर विभागात कारखाने बंदचा झाला परिणाम; साखर उत्पादन ‘इतक्या’ टनांनी घटले

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच झाल्याने साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले आहे. 

  कोल्हापूर : एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच झाल्याने साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले आहे.

  राज्यातील ऊस गाळप हंगाम यंदा एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला मात्र, ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील काही साखर कारखाने अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी साखर उत्पादनही घटले आहे. गेल्या वर्षी राज्यात २३ नोव्हेंबरपर्यंत ९१ सहकारी व ९२ खाजगी असे १८३ कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी १६६ लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तर सरासरी साखर उतारा ८.४ टक्के होता. मात्र, यंदा शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७६ सहकारी व ७८ खासगी असे एकूण १५४ कारखाने सुरू होऊ शकले आहेत. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही.

  सुरू झालेल्या कारखान्यांनी आतापर्यंत १०५ लाख टन ऊसगाळप केले असून त्यातून ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ७.६१ टक्के मिळाला आहे. आंदोलन सुरू असलेल्या कोल्हापूर विभागात १४ सहकारी व ८ खासगी कारखान्यांनी मिळून केवळ १४ लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून १.१६ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे. आंदोलन मिटले असल्याने आता कारखान्याची धुरांडी जोराने पेटणार आहेत. तरीसुद्धा हा गळीत हंगाम ११० दिवसाच्या पुढे चालणार नाही असे कारखानदारांचे म्हणणे आहे.

  शासन, कारखानदारांनी घेतला धसका

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील ४०० रुपये व आत्ताची ३४०० रुपये द्यावे त्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. याचा धसका कारखानदारांनी ही घेतला होता. काही कारखान्याव कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला तर सरकारशी ही चर्चा बिस्कटल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. अखेर पुणे बेंगलोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने शासन, कारखानदारांनी धसका घेतल्याने अखेर नम्रतेची भूमिका घेत दर जाहीर केले.

  ३० कारखाने सुरूच झाले नाहीत

  ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पेटले असून परिणामी राज्यातील साखर उत्पादन घटले आहे. एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून, गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. ऊसदराच्या आंदोलनामुळे अद्याप ३० कारखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे साखर उत्पादनात ६ लाख टनांची घट झाली आहे.