राज्यात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? विजय वडेट्टीवार यांनी सांगितला थेट आकडा

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शाहू महाराजांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत किती जागा जिंकणार याबाबत थेट आकडाच सांगितला आहे.

    कोल्हापूर – लोकसभा निवडणूकीच्या लवकरच तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी राज्यामध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडीसह महायुतीकडून अनेक जागांचा दावा केला जात आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये देखील निवडणूकीचा रणसंग्राम रंगला आहे. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारातर्फे आलेल्या विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शाहू महाराजांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर भाजपवर निशाणा साधला असून महाविकास आघाडी लोकसभा निवडणूकीमध्ये किती जागा जिंकणार याबाबत थेट आकडाच सांगितला आहे.

    विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर निशाणा साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विदर्भात देखील दहा जागा आम्ही जिंकत आहोत. नितीन गडकरी देखील नागपूरमधून निवडणूक जिंकणार नाहीत. महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होताना दिसत आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.

    शाहू महाराज ५ लाख मतांनी निवडून येतील

    पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले, “भाजपने घरं फोडली. पक्ष फोडले. आमच्या घराच्या देखील काही खिडक्या घेऊन गेले. नांदेडची खिडकी भाजपने काढून नेली, पण आमचं घर शाबूत आहे. सुशोभीत आहे. भाजपला काँग्रेसची किती भीती आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात दिसत आहे. आम्ही किमान ३८ जागा जिंकू अशी परिस्थिती दिसत आहे. देशात सत्तांतर होणार, तानाशाही, जुमलेबाज सरकार जाणार आहे. शाहू महाराज यांनी निवडणूक  लढावी, अशी आमची आणि कोल्हापूरकरांची इच्छा होती. ती त्यांनी मान्य केली. शाहू महाराज ५ लाख मतांनी निवडून येतील,” असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.