कोल्हापूर-सांगली महामार्ग बनला मृत्यूमार्ग ; बस व रिक्षा अपघातात दोन महिलासह लहान मुलाचा मृत्यू

सोमवारी हातकणंगले येथील कोल्हापूर सांगली महामार्गावरील रामलिंग फाट्या नजीक सायंकाळी पाचच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस व प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा यांचा अपघात होऊन दोन महिला व एक लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालक गंभीर जखमी असून त्यातील दोन वर्षाचा लहान मुलगा किरकोळ जखमी आहे.

  हातकणंगले : सोमवारी हातकणंगले येथील कोल्हापूर सांगली महामार्गावरील रामलिंग फाट्या नजीक सायंकाळी पाचच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस व प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा यांचा अपघात होऊन दोन महिला व एक लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालक गंभीर जखमी असून त्यातील दोन वर्षाचा लहान मुलगा किरकोळ जखमी आहे. या अपघातात जबाबदार कोण असा सवाल जनतेतून विचारला जात आहे . या अपघाताच्या ठिकाणी जीवाच्या आकांताने आईसाठी रडणारा दोन वर्षाचा मुलगा पाहता नागरिकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या. या अपघातास नेमके जबाबदार कोण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी की हातकणंगले पोलीस प्रशासन की प्रवासी करणारे नागरिक यावर अपघात स्थळावर उलट सुलट चर्चा सुरू होती.
  कोल्हापूर सांगली महामार्ग हा नेहमीच रहदारीसाठी ओळखला जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक तसे प्रवासी वाहतूक होत असते. याच मार्गावर दहा ते बारा ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अपघात रोखण्यासाठी हालचाली न केल्याने वारंवार प्रवासी त्याच चुका करून आपला जीव गमावताना काही दिवसापासून पहावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते, मात्र या कंपनीने हे काम वेळेत पूर्ण न करता ठराविक ठिकाणी काम अर्धवट सोडले आहे, काही ठिकाणी कामाला हाती लावला नाही. अनेक ठिकाणी फुलाचे सांगाडे उभा केले आहेत. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी काही दिवसापासून धोकादायक ठरत आहे. यातच हा मार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यानंतर लाखो रुपये खर्च करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम वारंवार केले जात आहे. मात्र खड्डे काही बुजत नाहीत. वारंवार त्याच ठिकाणी खड्डा पडत आहे. त्यातून अनेक किरकोळ अपघात होत आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी फाटे असून त्या  फाट्यावरत कोणत्याही प्रकारच्या सुचना अथवा दिशा दर्शविणारे पांढरे पट्टे, फलक लावलेले नाहीत. त्यामुळे नवीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा मार्गावरून प्रवास जीव मुठीत घेऊनच कराव्या लागत आहे.

  उपाययाेजनांकडे दुर्लक्ष
  साेमवारी घडलेल्या घटनेमुळे नागरिकांतून संबंधित प्रशासनावर चांगलेच तोंड सुख घेताना नागरिक दिसत आहेत. मागील काही वर्षांपासून श्रावण महिन्यात रामलिंग देवस्थानकडे जाताना महामार्गावर वाहतुकीचे गती मंदवण्यासाठी हातकणंगले पोलीस आडवे बॅरिगेटर्स लावत होते, मात्र चालू वर्षी अशा कोणत्याही स्वरूपाची खबर खबरदारी त्यांनी घेतली नाही. त्यामुळे तिघांना आपले प्राण गमवावे लागले, अशीही चर्चा नागरिकांतून अाहे.

   महामार्गावरील अपघात क्षेत्र
  शिरोली, हालोंडी, हेरले देसाईमळा, मालेफाटा,चोकाक, रुकडी फाटा, घोडावत कॉलेज, लक्ष्मीइंडस्ट्रीजफाटा, रामलींगफाटा, हातकणंगले इचलकरंजी फाटा, तारदाळ फाटा, घोडावत फार्महाऊस ते ट्रगल हॉटेल,
  जयासिंगपूर हद्द तमदलगे फाटा, इचलकरंजी फाटा, हॉटेल सू मंगल जवळ.

  अपघात झाल्या क्षणी अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे अनेक जण व्हिडिओ फोटो काढून व्हायरल करतात तेवढ्याच तत्परतेने त्या अपघातग्रस्तांना त्यांनी दवाखान्यात पाठवले तर अतिशय चांगले होईल. कोल्हापूर सांगली महामार्गावर अनेक छोट्या छोट्या चुका संबंधित खात्याने केल्या आहेत. वेळोवेळी पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग दिशादर्शक फलक, रबर स्पीडबेकर, यासारख्या सुविधा संबंधित खात्याने कोल्हापूर सांगली महामार्गावर करणे गरजेचे आहे. हातकणंगले परिसरात कुठेही अपघात झाला तर तत्काळ फोन करा. समर्थ रुग्णवाहिका त्यांना रुग्णालयापर्यंत मोफत सुविधा पुरवेल

  स्वप्नील नरुटे, समर्थ रुग्णवाहिका, हातकणंगले