कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे आगळेवेगळे स्वागत

कोणी एकेरी पट काढत तर कोणी समोरच्याचा तोल जोखत कुस्ती लागली. एकमेकांवर तुटून पडले होते.... आणि त्यांना चेतवण्यासाठी प्रेक्षकांच्या शिट्ट्या... आरोळ्या, हुंकाराने वातावरण नुसतं भरून गेले होते. हा कुस्तीचा खराखुरा फड रंगला होता शेळोली, कळमनुरीच्या रस्त्यावर.

  • राहुलजी गांधींनी कोल्हापूरकरांच्या रांगड्या अभिवादनाचा केला स्वीकार
  • सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी भारत जोडोच्या मार्गावर भारतयात्रींना घडवले कोल्हापूरच्या कला संस्कृतीचे दर्शन

कळमनुरी (हिंगोली) : लाल मातीत सजलेल्या कुस्तीच्या आखाड्यात (wrestling aakhada), कसलेल्या मजबूत शरीरयष्टीचे कोल्हापुरी पैलवान (Kolhapuri Wrestler) अंगाला तेल लावून उभे ठाकले होते. बाजूला उभ्या असलेल्या वस्तादानी हात उंचावून इशारा करताच सलामी झडली, नजरेला नजर भिडली आणि एकच झटपट सुरू झाली.

कोणी एकेरी पट काढत तर कोणी समोरच्याचा तोल जोखत कुस्ती लागली. एकमेकांवर तुटून पडले होते…. आणि त्यांना चेतवण्यासाठी प्रेक्षकांच्या शिट्ट्या… आरोळ्या, हुंकाराने वातावरण नुसतं भरून गेले होते. हा कुस्तीचा खराखुरा फड रंगला होता शेळोली, कळमनुरीच्या रस्त्यावर. तर या कुस्तीसाठी खास प्रेक्षक होते ते खुद्द राहुलजी गांधी (Rahul Gandhi), ते कुस्ती औत्सुक्याने न्याहाळत होते.

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील (Congress leader, former minister Satej Patil) यांनी अख्खे कोल्हापूरच आज कळमनुरीच्या रस्त्यावर उतरवले होते. कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध प्रतिकांना त्यांनी भारत जोडो यात्रेशी जोडले होते. त्यांची सखोल माहिती घेत, आपुलकीने चौकशी करत राहुलजींनी कोल्हापूरकरांच्या रांगड्या अभिवादानाचा स्वीकार केला.

लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती रंगली होती. त्याच्या पुढे हलगीचा कडकडाट होता आणि त्याच तालावर लेझीम पथकाने ठेका धरला. लवलवत्या पात्याच्या दांडपट्टाच्या चित्तथरारक कसरती सुरू होत्या. तर काही तरुणी लाठीकाठी या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवत होत्या. कोल्हापूरची शान समजल्या जाणाऱ्या, तुरा खोचलेल्या भगव्या फेट्यातील दहा हजार कार्यकर्त्यांची फौज नजरेच्या टप्यातही येत नव्हती.फेटयांच्या लांबच्या लांब रांगा दिसत होत्या. सगळं वातावरणच भगवामय झाले होते, अस्सल मराठीमोळी संस्कृतीचे दर्शन राहुलजींना घडवत कोल्हापूरकरांनी भारत जोडो यात्रेचे जोरदार स्वागत केले.

या संयोजनाबाबत बोलताना माजी मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, “समतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिला. त्यामुळेच कुस्ती जगभरात पोहोचली. कुस्ती आणि हलगी, मर्दानी खेळ ही कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा दर्शवत आम्ही राहुलजींच्या भारत जोडो यात्रेचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. ही यात्रा जातीधर्मातील भेद, द्वेष मिटवून सर्वांना प्रेमाने एकत्र आणणारी आहे. या यात्रेचा उद्देश नक्कीच सफल होईल, अशी माझी खात्री आहे.”