कोंढवा पोलिसांकडून पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश; ७ पिस्तुले, २४ काडतुसे जप्त; तिघांना अटक

  पुणे : कोंढवा पोलिसांनी मध्य प्रदेशातून कमी किंमतीत पिस्तूल आणून पुण्यात विक्री करण्याचा सराईतांचा डाव उधळला आहे. पोलिसांनी दोघा सराइतांसह तिघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून तबल ७ पिस्तुले, २४ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक दीनेशकुमार पाटील उपस्थित होते.
  संदेश उर्फ संजय अंकुश जाधव  (वय ३२ रा. मोरे वस्ती चिखली) शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर (वय ३४ रा.मु.पो वाशेरे, ता.खेड)  राहुल नानसिंग लिंगवाले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
  ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार  विशाल मेमाणे, निलेश देसाई व त्यांच्या पथकाने केली.
  पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग व गस्तीवर
  कोंढवा पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग व गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अमलदार विशाल मेमाणे यांना सराईत गुन्हेगार पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा कारवाईकरून १४ डिसेंबरला या सराईताला पिस्तूल विक्रीसाठी बोपदेव घाटात आल्यानंतर प्रवाशी वाहनातून उतरताच पकडले.  त्यांच्याकडे चौकशी केली. अंगझडीत दोन पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली.
  त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर घरझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडून आणखी ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केली.
  २ पिस्तूल आणि १०  काडतुसे जप्त
  त्यामुळे त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हे आरोपी मध्यप्रदेशातील बडवणी जिल्ह्यातील ओंकार बर्नाला याच्याकडून कमी किंमतीत पिस्तूल आणून पुण्यात तेच पिस्तुल जास्त किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती सराईतांनी पथकाला दिली. त्यानुसार पथकाने मध्यप्रदेशात कारवाई करून ओंकार बर्नाला याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ओंकारचा हस्तक राहूल लिंगवाले याच्याकडून आणखी २ पिस्तूल आणि १०  काडतुसे जप्त केली.  आता त्याच्याकडे सखोल तपास केला जात आहे.
  साडेतीन लाखांचा ऐवज जप्त
  सराईत संदेश जाधव याच्यावर चिखली, देहुरोड, वडगाव मावळ, निगडी, भोसरी पोलीस ठाण्यात दरोडयाचा प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, बेकायदेशीर पिस्तूळ जवळ बाळल्याचे तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत. तर शिवाजी याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. तिन्हीही आरोपींकडून ७ पिस्तुले, २४ काडतुसे असा साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
  २० ते ४० हजारात पिस्तूलांची विक्री
  सराईत संदीप जाधव वाहन चोरीच्या गुन्ह्यात असताना त्याला शस्त्र विक्रीतून जादा पैसे मिळतात, अशी माहिती मिळाली. त्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने साथीदाराच्या मदतीने मध्यप्रदेशातील हस्तकामार्फत पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, कोंढवा पोलिसांनी टोळीचा पर्दापाश करीत शस्त्रासाठा जप्त केला आहे.
  दोघा सराईतांसह तिघांना अटक
  कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने दोघा सराईतांसह तिघांना अटक केली. तपासात त्यांच्याकडून ७ पिस्तूल, २४ काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
  संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे