कोपरखैरणे पोलिसांची दुसऱ्यांदा धडक कारवाई, ४ लाख ५० हजारांचे ब्राऊन शुगर जप्त

१७ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार सागर टकले हे गस्त घालत असताना सेक्टर १० येतील ओम ज्योत अपार्टमेंट जवळ एक महिला व पुरुष संशयितरित्या आढळून आले.

    नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी (Koparkhairane Police) धडक कारवाई करत दुसऱ्यांदा साडेचार लाखांचे ब्राऊन शुगर आणि अंमली पदार्थ जप्त केले असून एकाला अटक करण्यात आली आहे. एक महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९ मधील रहिवासी संकुलमधून ३१ लाख ६० हजारांचे एम डी आणि ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ जप्त करून यात २ महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली होती.

    १७ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार सागर टकले हे गस्त घालत असताना सेक्टर १० येतील ओम ज्योत अपार्टमेंट जवळ एक महिला व पुरुष संशयितरित्या आढळून आले. त्यानंतर त्यांच्या जवळ चौकशी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तेथून पळ काढला. सागर टकले यांनी पाठलाग करून संतोष मणिराम राठोड वय ४५ वर्ष याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या जवळून ४५ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. याचे बाजार भाव ४ लाख ५० हजार असून यात संतोष राठोड याची पत्नी सागर संतोष राठोड वय ४० वर्ष ही अंधाराचा फायदा घेऊन तिच्या जवळ असलेल्या अंमली पदार्थाचा साठा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली असून या बाबत पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.