कोरा केंद्र उड्डाणपुल वादाच्या भोवऱ्यात; पालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका

बोरिवलीतील कोरा केंद्र येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. निर्माणाधीन असलेल्या या पुलाच्या किंमतीत ५० टक्क्याने वाढ झाल्याने बृहन्मुंबई महानगर पालिकेविरोधात जनहित याचिका करण्यात आली असून न्यायालयाने पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

    मुंबई : बोरिवलीतील कोरा केंद्र येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. निर्माणाधीन असलेल्या या पुलाच्या किंमतीत ५० टक्क्याने वाढ झाल्याने बृहन्मुंबई महानगर पालिकेविरोधात जनहित याचिका करण्यात आली असून न्यायालयाने पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

    बोरीवली पश्चिमेकडील कोरा केंद्र परिसरातील एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे मार्ग ते कल्पना चावला चौकापर्यंत नवा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामाला नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरुवात झाली हे काम २४ महिन्यात पूर्ण होणार होते. मात्र, पुलाचा विस्तार करण्यासाठी आणखी काम वाढल्यामुळे उड्डाणपुलाच्या खर्चांतही ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.

    काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबीयांना उड्डाणपुलाचे कंत्राट देण्यात आले असल्याचा आरोप करत महापालिकेविरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. कोणतिही नवीन निविदा प्रक्रिया न राबवता पूलाचा विस्तार वाढवण्यात आल्याचा दावा याचिकेत केला आहे.

    तसेच उड्डाणपूलाच्या कंत्राटबाबत सक्षम अधिकाऱ्याकडून निविदा देण्याच्या प्रक्रियेची पडताळणी करण्यात यावी, अथवा कागदपत्रांची छाननी करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी एसआयटीला नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

    याचिकेची दखल घेत न्यायालयाने मुंबई महापालिकेला प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत १२ जुलै रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.