कोयना जलाशय अटला! धरणात अवघे पंधरा केएमसी पाणी शिल्लक

दुष्काळाची झळ जशी दुष्काळग्रस्त भागात जाणवते आहे, तशीच धरण परिसरात  जाणवत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस महाबळेश्वरमधील जावळी येथील कांदाटी विभागांमध्ये पडतो.

  पाचगणी : दुष्काळाची झळ जशी दुष्काळग्रस्त भागात जाणवते आहे, तशीच धरण परिसरात  जाणवत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस महाबळेश्वरमधील जावळी येथील कांदाटी विभागांमध्ये पडतो. चेरापुंजीनंतर या विभागात विक्रमी पावसाचा रेकॉर्ड नोंद आहे. अती पावसाच्या या विभागाला अशा पातळीवर दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतील असा विचार कोणीही केला नसेल. मात्र गेल्या शंभर वर्षात तिसऱ्या वेळेस या विभागाला अशा पद्धतीच्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

   जून संपत आला तरी पावसाची प्रतीक्षाच 

  जून महिना संपत आला तरीही अद्याप या विभागाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पूर्वी 6 जूनपासूनच पहिल्याच पावसात कोयना जलाशय तुडुंब पाण्याने भरून व्हायचे. यंदा जून महिना संपत आला तरी अद्यापही या जलाशयात पाण्याचा एक एक थेंब शोधावा लागत आहे. जलाशयात पाणी नसल्याने जमिनीवर भेगा पडल्या आहेत. साताऱ्यातील जावळी महाबळेश्वर विभागातील कोयना धरणाचा जलाशय आटल्यामुळे याचा मोठा फटका तापोळा बामणोली पर्यटनाला देखील बसताना दिसत आहे.

   बामणोली-तापोळा परिसराला मोठा फटका
  मिनी कश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरनंतर पर्यटकांची पावले वळतात ती हिरवागार निसर्ग तसेच कोयना जलाशतील बोटिंगची मजा लुटण्यासाठी बामणोली-तापोळ्याकडे, मात्र अलीकडच्या वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. येथे कधीही दुष्काळ न पाहिलेल्या भागाला आता दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण समजले जाणाऱ्या कोयनेच्या जलाशयात सध्या फक्त 15 टीमसी एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. या धरणाच्या मागील बाजूचा पाण्याचा फुगवटा 85 किलोमीटर लांब इतका पसरलेला आहे. धरणात पाणी पातळी खालावल्यामुळे बामणोली-तापोळा परिसराला याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे या भागात पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे या परिसरात चालणारा मासेमारी तसेच बोटिंग व्यवसाय बंद झाला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. सातारा जिल्यातील पूर्वेकडील माण-खटावचा भाग कायम दुष्काळाने होरपळलेला असतो. तर पश्चिमेकडील कांदाटी खोरे हे कायम हिरवगार निसर्गाने नटलेल हे चित्र कायम पाहायला मिळते. पण मागील काही वर्षात कांदाटी खोऱ्यातील चित्र बदललेले पाहायला मिळत आहे.

   शासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे
  बामणोली परिसरात जलाशयाची पाणी पातळी आटल्यामुळे जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. तर पहिल्या काळातील जुन्या बामणोली गावांचे तसेच मंदिरांचे भग्नावशेष या भागात पाहायला मिळत आहेत. महाबळेश्वरमधून या परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा हे विदारक चित्र पाहून मोठा हिरमोड होताना दिसत आहे. कोयना धरण बांधल्यानंतर कांदाटी, बामणोली खोऱ्यातील ज्या लोकांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या, त्या लोकांवर दुष्काळाच मोठ संकट उभे राहिले आहे, अशा वेळी त्यांच्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.