
श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्याने (Kukadi Sugar Factory) एफआरपीपेक्षा ज्यादा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे काम केले. कारखान्याला 105 कोटींचा तोटा दिसत आहे. को-जरनेशनचे कर्ज कमी केले. आता दुसरा हप्ता देऊन सभासदांची दिवाळी गोड करणार आहे. तसेच कामगारांना बोनस, पुढील अहवाल सालात हा तोटा कमी करुन कुकडी साखर कारखान्याला वैभवशाली करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी पिंपळगाव पिसा येथे दिली.
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देत ऊस तोडणी मजुरांना 10 कोटींची आगाऊ रक्कम दिली आहे. त्यामुळे कारखाना वेळेवर सुरु करणार आहे. शेतकी ऊस कारभार सुधारण्यासाठी सभासदांनी केलेल्या सूचनांचे पालन करणार आहे. संस्थापक स्व. कुंडलिकतात्यांचे स्मारक लवकरच उभे करणार आहे. खत विभाग चालू करणार आहे. आणि ऍडव्हास वसुलीसाठी न्यायालयीन लढाई चालू केली आहे.
बीआरएसचे नेते घनश्याम शेलार म्हणाले की, ‘राहुल जगताप आपण राजकीय चष्मा बाजूला ठेवून सभासदांनी मांडलेल्या सूचनांतून बोध घेणार का? शेजारी साखर कारखाने तीन हजाराच्या वर भाव देऊ लागले आहेत. आपण मात्र किती भाव देतो मग आपणास शेतकरी ऊस कसा देतील? यावर चिंतन करण्याची गरज आहे. तालुक्यातील 15 लाख मे. टनापैकी कुकडीला फक्त 56 हजार मे. टन ऊस मिळाला. भविष्यात खाजगी साखर कारखानदारीने डोके वर काढू नये म्हणून आपण जबाबदारीने कारभार करावा.
जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर म्हणाले की, गेल्या वर्षी सभासदांच्या 56 हजार मे टन उसाचे गाळप कुकडीने केले. मग किमान अशा सभासदांना चांगला भाव द्या. ऍडव्हान्स पोटी 63 कोटी कुणाला वाटप केले? 105 कोटींचा संचित तोटा कसा झाला? यावर मार्ग काढून ऊसाला चांगला भाव द्या. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे म्हणाले की, जगताप परिवाराने कुकडी साखर कारखान्याच्या माध्यमातून वंचित भागाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले.
यावेळी बंडू जगताप जयसिंग गावडे, बाजीराव घालमे, सोमनाथ खेडकर, दादा जाधव, गणेश बेरड, शंकर धारकर, तानाजी बोरुडे, अशोक ईश्वरे, बाळासाहेब पवार, सुभाष काळोखे, महादेव डोंगरे, गणेश इथापे, गोरख ढोले, बाळासाहेब लगड यांची भाषणे झाली.
अहवाल वाचन कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार व प्रभारी कार्यकारी संचालक अनिल भगत यांनी केले. सूत्रसंचालन मोहनराव आढाव यांनी केले. तर आभार जालिंदर निंभोरे यांनी मानले.