…तेंव्हाच मी कुणबी नोंदीचा लाभ घेईल; सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम

जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

    बीड : जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. माझ्या कुणबी प्रमाणपत्राविषयी काय चर्चा झाली ते मला माहित नाही. जसं इतरांचं सापडलं तसंच माझंही सापडलं असेल. पण माझ्या वडिलांनी ते स्विकारलं असेल तर मला माहिती नाही. पण जर वडिलांनी ते स्विकारलं नसेल तर आम्ही ते स्विकारणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

    सगळाच मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. मी कुठला नवसाचा नाही, जसा गोरगरिबांचा सापडलं तसंच माझी नोंद सापडली असेल. कारण आम्ही आमच्यासाठी हापापले नाही आहोत. हा लढा आमच्या लेकरांसाठी सुरु आहे. त्यामुळे माझ्यासकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेल तेव्हा मी ही नोंद स्विकारेन, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. माझी कुणबी नोंद सापडली माझे वडिल तिथे गेले होते, पण ते तिथे गेले की त्यांना नेलं होतं हा देखील प्रश्न असल्याची शंका देखील जरांगेंनी व्यक्त केली. मागील तीन चार दिवसांपासून माझ्याच प्रमाणपत्राची का चर्चा केली जातेय, याची देखील शंका मला वाटायला लागली असल्याचं जरांगेंनी म्हटलं.

    मनोज जरांगेंचा मुंबईत एल्गार

    मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंदोलन करत आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती. या मुदतीमध्ये सरकारने या बाबतनिर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या 20 जानेवारीपासून मागे हटायचं नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यासाठी मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी मैदानाची मागणी केली आहे.

    मनोज जरांगे पाटील सध्या गोदा काठच्या गावांचा संवाद दौरा करत आहेत आहेत. काल रात्री जरांगे पाटील कोठाळ गावात गेले असता त्यांच्या स्वागतासाठी 51 ट्रॅक्टरची रॅली काढत स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील या दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला मुंबईतील मोर्चामध्ये येण्याचे आवाहन करत आहेत.