कुरुंदवाड पोलिस नवीन इमारत बांधणीसाठी ४ कोटी ५० लाख मंजूर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कुरुंदवाडकरांची नवीन पोलिस स्टेशन इमारत मागणीची पूर्तता पूर्ण झाली असून, सुसज्ज व अद्ययावत कुरुंदवाड पोलिस नवीन इमारत बांधणीसाठी ४ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

    कुरुंदवाड : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कुरुंदवाडकरांची नवीन पोलिस स्टेशन इमारत मागणीची पूर्तता पूर्ण झाली असून, सुसज्ज व अद्ययावत कुरुंदवाड पोलिस नवीन इमारत बांधणीसाठी ४ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार आहे. या इमारतीमुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून, पोलिसांना वेळेवर कामकाज करणे सोपे होणार आहे.
    सध्या संस्थानकालीन इमारतींमध्ये पोलिस स्टेशनचा कारभार सुरू आहे. शिवाय मध्यवस्तीत असल्याने अनेकवेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत असते. तसेच बाजारपेठेकडे जाणारा मुख्य रस्ता लगतच ही इमारत असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी निर्माण होत असते. सध्या कर्नाटक सीमाभागासह २७ गावे या पोलिस स्टेशनच्या अखत्यारित येतात.
    पोलीस ठाण्यासाठी ८ गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात आले असून, यामध्ये संपूर्ण कॉलनीला कंपाऊंडही घालण्यात येणार आहे.  दोन पोलीस अधिकारी केबिन, पोलिस विश्रांती कक्ष, स्वतंत्र वायरलेस यंत्रणा कक्ष, तक्रारदारांसाठी बसण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग, शौचालय, संपूर्ण इमारत उपयुक्त फर्निचर आदी सुविधा या इमारतीमध्ये असणार आहेत.
    इमारत भक्कम होण्यासाठी ३० फूट खोल पाईल्स मारून माती व दगडाचे नमुने तपासले गेले आहेत. पोलिस गृहनिर्माण संस्था या इमारतीचे बांधकाम  करणार असून, त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.
    कुरुंदवाड शहरासाठी नवीन पोलिस इमारत मंजूर होणे ही आनंदाची बाब आहे. कारण अडचणीच्या व अरुंद अशा ठिकाणी इमारत असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ती अडचण आता दूर होऊन या नवीन वास्तूमुळे कुरुंदवाड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
    – दादासो पाटील, माजी नगराध्यक्ष, कुरुंदवाड
    कुरुंदवाड पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या इमारतींमुळे पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्य इमारतीची अडचण दूर होऊन कामकाजात सुलभता येणार आहे. पोलीस गृहनिर्माण संस्थेच्या वतीने याचे बांधकाम होणार असून, निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.
    – बालाजी भांगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कुरुंदवाड.