
सासवडमधून हडपसरला निघालेला कामगार वाहतूक करणारा टेम्पो दिवे घाटात पलटी झाल्याचा प्रकार रविवारी घडला. या अपघातात टेम्पोतील १४ कामगार जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. तर एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे : सासवडमधून हडपसरला निघालेला कामगार वाहतूक करणारा टेम्पो दिवे घाटात पलटी झाल्याचा प्रकार रविवारी घडला. या अपघातात टेम्पोतील १४ कामगार जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. तर एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेकराईनगर येथे बांधकामाचे काम सुरू असल्याने सासवडच्या दिशेने हा टेम्पो भेकराई नगरकडे निघाला होता. या टेम्पोमध्ये कामगाराबरोबरच बांधकामाचे साहित्य देखील भरलेले होते.
दिवेघाटातून हडपसरच्या दिशेने निघालेल्या टेम्पो घाटाच्या दुसर्या वळणावर वळत असतानाच अचानक टेम्पो पलटी झाला. यामध्ये टेम्पो मधील सेंट्रींगचे सामान कामगारांच्या अंगावर पडल्याने कामगार जखमी झाले. यावेळी रस्त्याने जाणार्या नागरिकांनी तात्काळ या कामगारांना बाहेर काढत त्यांना सासवड येथील रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या कामगारांपैकी दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यातील एका कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले. तर इतर कामगार किरकोळ जखमी होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. एका कामगारांवर सध्या सासवडच्या रुग्णाला उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन रस्त्यातील टेम्पो बाजुला केल्याचे अग्निशमन अधिकारी गायकवाड यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.